उत्तर भारताची थंडी विदर्भालाही गारठवणार, शेवटच्या आठवड्यात अधिक हुडहुडी
By निशांत वानखेडे | Published: December 18, 2023 06:53 PM2023-12-18T18:53:38+5:302023-12-18T18:53:53+5:30
यावर्षीचे शेवटचे दिवस बाेचणाऱ्या गारठ्यात जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
नागपूर : उत्तर भारतात सध्या प्रचंड थंडीची लाट पसरली आहे. पारा ४ ते ८ अंशावर घसरला असून बर्फासह धुक्याची चादर पसरली आहे. उत्तरेकडून थंड वारे वाहून नेण्यासाठी अनुकूल असलेले कमी दाबाचे क्षेत्र सध्या मध्य प्रदेश व महाराष्ट्रावर अस्तित्वात येत आहे. त्यामुळे यावर्षीचे शेवटचे दिवस बाेचणाऱ्या गारठ्यात जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
या अंदाजानुसार विदर्भातील संपूर्ण ११ व खान्देशातील ३ जिल्ह्यासह नाशिक नगर छ.संभाजीनगर, जालना, बीड नांदेड हिंगोली परभणी अश्या महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात दिवसा-रात्रीच्या थंडीतही वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विदर्भातील पहाटेचे किमान तापमान हे १० ते १२ डिग्री सेल्सियस किंवा त्याखाली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात किमान तापमान सरासरी १२ ते १४ अंशाच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यात कमाल तापमानही सरासरीच्या खाली जाण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशाबरोबर जोरदार ईशान्य थंड वारे महाराष्ट्राच्या भू-भागावर ओढले जाण्याची शक्यतेमुळे कडाक्याच्या थंडीचा प्रभाव या भागात जाणवणार आहे. मात्र यावर्षी हिवाळी हंगामात शीत- लहरींची संख्याही दरवर्षीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.
दरम्यान साेमवारी नागपूरसह विदर्भात सर्वत्र कमाल व किमान तापमानात अंशत: घसरण झाली. नागपुरात रात्रीचा पारा १२.८ अंशावर गेला. कमाल पारासुद्धा सरासरीच्या २ अंशाने खाली २६.८ अंशावर आहे. १२ अंश किमान तापमानासह गडचिराेली सर्वात थंड तर गाेंदियामध्ये पारा १२.५ अंशावर हाेता. इतर जिल्ह्यात रात्रीचे तापमान १३ अंशाच्यावर म्हणजे सरासरीत आहे. नागपुरात सकाळी आकाशात ढगांची गर्दी जमली हाेती, ज्यामुळे सूर्याचे दर्शन नागरिकांना थाेडे उशीराच झाले. आकाशात ढग व खाली थंड वातावरणामुळे लाेकांना हुडहुडी भरली हाेती. त्यामुळे कधी सूर्य निघताे, याची प्रतीक्षा लागली हाेती. त्यानंतर दिवसभर तुरळक ढगांची हजेरी हाेती. सायंकाळी तापमान पुन्हा घसरले.