थायरॉइड कॅन्सरमध्ये जगात उत्तर कोरिया अग्रस्थानी : ग्रेगरी रॅन्डॉल्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 11:01 PM2020-01-10T23:01:48+5:302020-01-10T23:03:10+5:30
जगामध्ये १२ लाखांपेक्षा जास्त रुग्ण थायरॉइड कॅन्सरने पीडित असून दर वर्षी साधारणपणे तीन लाख नवीन रुग्णांची भर पडते. तसेच ४० हजार रुग्ण या रोगाने दरवर्षी दगावतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगामध्ये १२ लाखांपेक्षा जास्त रुग्ण थायरॉइड कॅन्सरने पीडित असून दर वर्षी साधारणपणे तीन लाख नवीन रुग्णांची भर पडते. तसेच ४० हजार रुग्ण या रोगाने दरवर्षी दगावतात. जगात या कॅन्सरचे सर्वाधिक, ७ टक्के रुग्ण उत्तर कोरिया येथे आढळून येतात तर,३ टक्के रुग्ण अमेरिकेत आढळून येतात. भारतात या कॅन्सरची नोंद ठेवली जात नाही. तरी सुमारे दोन-तीन टक्के रुग्ण दिसून येतात. या कॅन्सरची कारणे अद्यापही अनभिज्ञ आहेत. हा रोग स्त्रियांमध्ये, ४० वर्षानंतर अधिक दिसून येतो, अशी माहिती थायरॉईड कॅन्सर विशेषज्ञ (अमेरिका) डॉ. ग्रेगरी रॅन्डॉल्फ यांनी दिली.
‘असोसिएशन ऑफ ऑटोलरिंगोलॉजिस्टस ऑफ इंडिया’च्यावतीने (एओआय) व ‘एओआय’ विदर्भ यांच्या संयुक्त विद्यमाने कान-नाक-घसा (ईएनटी) तज्ज्ञाची ७२ वी परिषद नागपुरात आयोजित करण्यात आली आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी विशेषज्ञांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. रॅन्डॉल्फ म्हणाले, महिलांमध्ये थायरॉइड कॅन्सरचे प्रमाण मोठे असले तरी हा आजार उपचारानंतर महिलांमध्ये लवकर नियंत्रणातही येतो.
‘हेड अॅण्ड नेक सर्जरी’ आणखी झाली सुलभ-डॉ. टॉली
अमेरिकेचे हेड अॅण्ड नेक सर्जन डॉ. नील टॉली म्हणाले, पूर्वी ‘हेड अॅण्ड नेक’ सर्जरीनंतर आवाज जाणे, गिळताना त्रास होणे, अशा अनेक समस्येला रुग्णाला तोंड द्यावे लागायचे. परंतु डॉक्टरांमध्ये या शस्त्रक्रियेचे वाढलेले कौशल्य, अनुभव व अद्यायावत तंत्रज्ञानामुळे या समस्या आता कमी झाल्या आहेत. पूर्वीच्या तुलनेत ही शस्त्रक्रिया आणखी सुलभ झाली आहे. हे एक आशादायी चित्र आहे.
श्रवण क्षमतेची चाचणी अत्यावश्यक-डॉ. दुबे
‘एओआय’चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सत्यप्रकाश दुबे म्हणाले, जगभरात साधारण ३६० दशलक्ष लोकांना श्रवणदोष आहे. यातील जवळपास अर्ध्या प्रकरणांमधील श्रवणदोष उपचारांनी बरा होऊ शकतो. परंतु भारतात लहानपणीच इतर चाचण्यांबरोबरच श्रवण क्षमतेची चाचणी करून घेण्याचे प्रमाण फारच कमी आहे. परिणामी, उपचार असूनही अनेकांवर आयुष्यभर मूकबधिर अवस्थेत जीवन जगावे लागते. श्रवणदोषावर ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया पर्याय ठरत आहे. ‘याचे महत्त्व लक्षात घेऊनच मध्य प्रदेशासह इतर ११ राज्यात बाळ श्रवण ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेतून ६ लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाते. याचा फायदा बहुसंख्य बालकांना होत आहे. मात्र, महाराष्ट्रात ही योजना अद्यापही कार्यान्वित झाली नाही.
वयोवृद्धांसाठीही कॉक्लीअर इम्प्लांट-डॉ. अग्रवाल
डॉ. संजय अग्रवाल म्हणाले, जन्मजात श्रवणदोष दूर करण्यासाठी ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ महत्त्वाचे ठरते. परंतु सुरुवातीला हे यंत्र तयार झाले ते वृद्धांसाठीच. मात्र याचा फायदा बालकांसारखा वृद्धांना होताना दिसून येत नाही. महत्त्वाचे म्हणजे, श्रवणदोष असलेल्या गरजू व गरीब रुग्णांसाठी शासनाच्या काही योजना आहेत, मात्र त्या योजना वृद्धांसाठी नाहीत. शासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
१५ लाईव्ह सर्जरीतून दिले प्रशिक्षण-डॉ. कापरे
परिषदेचे अध्यक्ष डॉ. मदन कापरे म्हणाले, या परिषदेत आतापर्यंत १५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कॉक्लीअर इम्प्लांट, थायरॉईड कॅन्सर, नाकाची प्लास्टिक सर्जरी, मुख कर्करोगाच्या शस्त्रक्रियांचा समावेश होता. या शस्त्रक्रियेतून उपस्थित ईएनटी तज्ज्ञाना मार्गदर्शन करण्यात आले.
२२००वर ईएनटी तज्ज्ञाचा सहभाग
परिषदेच्या शास्त्रीय शाखा अध्यक्ष डॉ. देवेंद्र माहोरे म्हणाले, परिषदेत देश व विदेशातून २२०० ईएनटी तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. यात विदेशातील डॉ. संतदीप पॉन, डॉ. नील टॉली, डॉ.रॉबर्ट व्हिसेंट, डॉ. ग्रेगरी रॅन्डॉल्फ, डॉ. सबॅस्टीयन हॅक, डॉ. मझीन अल खुबरी आदींचा सहभाग आहे. परिषदेत कान, नाक, घसा संबंधित विविध आजार व त्यांचे आधुनिक उपचार यावर मार्गदर्शन केले जात आहे, असेही ते म्हणाले. यावेळी ईएनटी तज्ज्ञ डॉ. अपूर्व पावडे उपस्थित होते.