उत्तरेत दाणादाण
By admin | Published: August 14, 2015 03:11 AM2015-08-14T03:11:17+5:302015-08-14T03:11:17+5:30
उत्तर नागपुरातील समतानगर भागातील अनेक झोपड्यांत पाणी शिरले, तर असंख्य झोपड्या वाहून गेल्या.
समतानगरातील झोपड्या गेल्या वाहून
नागपूर : उत्तर नागपुरातील समतानगर भागातील अनेक झोपड्यांत पाणी शिरले, तर असंख्य झोपड्या वाहून गेल्या. घटनेची माहिती मिळताच सुगतनगर फायर स्टेशनच्या तीन गाड्या पोहोचल्या. यातील काही अग्निशमन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी समतानगरातील वसंता भोयर, त्यांची पत्नी आणि मुलगी हे घरात अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू आॅपरेशन राबवावे लागले. याशिवाय दुर्गादेवी मंदिर, राहुल बोधी बुद्धविहारात पाणी शिरले होते. अग्निशमन विभागाने आणलेली बोट बंद पडल्यामुळे नागरिकांनी हाताने पकडून ही बोट बाहेर काढली. याशिवाय समतानगर भागातील रस्ते, पूल, घर, दुकाने सर्वच पाण्यात बुडून गेली होती.
कस्तुरबानगरात
आजी-नातू पुरात वाहून गेले
मुसळधार पावसामुळे उत्तर नागपुरातील कस्तुरबानगरात दोघांचा बळी गेला आहे. घरात झोपले असताना नाल्याला आलेल्या पुराने दोघेही वाहून गेले. आजीचा मृतदेह नारा पुलाजवळ परिसरात सापडला असून, नातू अद्यापही बेपत्ता आहे. जरीपटका, कस्तुरबानगर गल्ली नंबर ५ येथे अनंतराव नेवारे हे राजू भोंगाडे यांच्या घरी किरायाने राहतात. राजू भोंगाडे यांनी नाल्यावर घर बांधले आहे. गुरुवारी सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आला. सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास अनंतराव नेवारे यांच्या पत्नी रेखा नेवारे (५०) व त्यांचा नातू यश अंबारे (३) हे घरात पलंगावर बसले होते. नाल्याला पूर आल्यामुळे त्यांच्या घराची भिंत कोसळली आणि हे तिघेही वाहून गेले. यातील अनंतराव यांना एका कोसळलेल्या झाडाचा आसरा मिळाल्याने त्यांना वाचविण्यात नागरिकांना यश आले तर त्यांच्या पत्नी रेखा नेवारे आणि नातू यश अंबारे हे दोघेही पुरात वाहून गेले. रेखाचा मृतदेह नारा पुलाजवळ आढळला, मात्र यश अद्यापही बेपत्ता आहे. कस्तुरबानगरात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. अग्निशमन विभागाचे पथक त्याचा शोध घेत आहे.
घरी जाण्यासाठी नव्हता रस्ता
उत्तर नागपुरातील संघर्षनगर आणि यशोधरानगर परिसरात जाणाऱ्या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांना घराकडे जाण्यासाठी रस्ता उरला नव्हता. अनेक दुचाकी चालकांनी हिंमत करून आपल्या दुचाकी या रस्त्यावरील पाण्यातून काढल्या तर अनेकांनी ‘रिस्क’ नको म्हणून पाणी कमी होण्याची वाट पाहिली.
तीन वर्षांपासून नाले सफाई नाही
उत्तर नागपुरात मोठ्या नाल्यांची मनपाने पावसाळ्यापूर्वी सफाई केली असली तरी, लहान नाल्यांच्या सफाईसाठी मनपाकडे यंत्रणाच नाही. त्यामुळे लहान नाले साफ होऊ शकले नाही. अनेक नाल्यांना भिंती नसल्याने थोडा जरी पाऊ स आल्यास नाल्याचे पाणी लोकांच्या घरात शिरते. गुरुवारी तर कहरच झाला. नाले पावसामुळे ओव्हरफ्लो झाले.
नारा परिसरात स्कूल बस फसली
मुसळधार पावसामुळे उत्तर नागपुरातील नारा परिसरातील एका शाळेच्या स्कूलबस फसल्या होत्या. पाऊस एवढा झाला की उभ्या बसमध्ये पाऊस शिरला होता. नारा पुल पाण्याखाली आल्याने सकाळी शाळेतून घराकडे निघणारे विद्यार्थी पुलाचे पाणी कमी होण्याची वाट बघत होते. पुलाच्या एका बाजूला स्कूलबस पाणी कमी होण्याची वाट बघत होती. मात्र पाण्याचा जोर वाढल्याने स्कूलबसमध्ये पाणी शिरले. त्यामुळे विद्यार्थी घाबरले होते. परिसरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढले.