उत्तर नागपुरात गुन्हेगारांची दहशत
By admin | Published: April 13, 2016 03:08 AM2016-04-13T03:08:23+5:302016-04-13T03:08:23+5:30
पोलिसांनी नेभळट भूमिका स्वीकारल्यामुळे उत्तर नागपुरात सध्या गुन्हेगार सोकावले आहेत.
पोलिसांची नेभळट भूमिका : सर्वसामान्य त्रस्त
नागपूर : पोलिसांनी नेभळट भूमिका स्वीकारल्यामुळे उत्तर नागपुरात सध्या गुन्हेगार सोकावले आहेत. परिणामी सर्वसामान्य नागरिक दहशतीत आहेत. महिलांना मारहाण, विनयभंग, खंडणी वसुली असे प्रकार सर्रास सुरू आहेत.
जरीपटक्यातील बाजारात सोमवारी सायंकाळी एका महिलेला गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांनी छेडण्याचा प्रयत्न केला. महिलेने चप्पल काढल्यानंतर आरोपींनी तिला अश्लील शिवीगाळ करीत पळ काढला. भाजीबाजार तसेच रस्त्यावर छोटी छोटी दुकाने थाटून आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्यांकडून या घटनेतील आरोपींचे टोळके खंडणी वसुली करते. पोलिसांशी मैत्री असल्यामुळे तक्रार करूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. उलट तक्रार केल्याची माहिती पोलिसांकडून मिळत असल्याने, आरोपींचे टोळके नंतर पीडिताला वेठीस धरतात. तक्रारदाराकडून प्रकरण रेटून धरल्यास जुजबी कारवाई करून आरोपीला लगेच मोकळे केले जाते. त्यामुळे या गुन्हेगारांविरुद्ध पुन्हा कुणी आवाज काढण्याची हिंमत दाखवत नाही. शुक्रवारी रात्री जरीपटक्यात महेश अंडरसहारे आणि त्याची पत्नी ममता या दोघांनी ५० वर्षीय महिलेला तिच्या घरात शिरून बेदम मारहाण केली. तिचे कपडे फाटेपर्यंत आरोपींनी तिला अपमानीत केले.
जरीपटका पोलिसांनी गुन्हे तर दाखल केले, मात्र आरोपी अंडरसहारेला पाहुण्यासारखी वागणूक दिल्यामुळे खुद्द पोलीस ठाण्यातीलच काही कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पाचपावलीतील आठवडी बाजारात वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या मनोज बन्सोडच्याही पोलिसांनी अद्याप मुसक्या बांधल्या नाही. एका महिलेवर अत्याचार करणारा कुख्यात गुंडही मोकाटच आहे.(प्रतिनिधी)