१२० नव्हे आता रेल्वेगाडी धावत आहे १३० च्या स्पीडने, १० नोव्हेंबरपासून निघाल्या सुसाट
By नरेश डोंगरे | Published: November 17, 2023 05:54 PM2023-11-17T17:54:40+5:302023-11-17T17:56:14+5:30
थर्ड, फोर्थ लाईन तसेच सिग्नल सिस्टमचा फायदा
नागपूर : मध्य रेल्वेच्या क्षेत्रात झालेल्या विकास कामांमुळे रेल्वेगाड्यांनी आता चांगलीच स्पीड पकडली आहे. त्यामुळे विविध रेल्वेगाड्या आता चक्क १३० किलोमिटर प्रतितास वेगाने धावू लागल्या आहेत.
रेल्वेशी संबंधित विविध विकास कामांना तसेच प्रकल्पांना मिळालेल्या मंजूरीमुळे देशभरातील रेल्वेचे नेटवर्क अधिकच प्रशस्त झाले असून, आधुनिक उपकरणांमुळे रेल्वेचे संचालनही सुरक्षित होत आहे. स्वयंचलित सिग्नल सिस्टम आणि थर्ड तसेच फोर्थ लाईनमुळे एका गाडीसाठी दुसरी गाडी थांबविण्याची अर्थात रेल्वेगाडी रेंगाळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. एकाच वेळी वेगवेगळ्या रेल्वेगाड्या वेगात धावू लागल्या आहेत. १० नोव्हेंबरपासून ईगतपूरी- नाशिक - भुसावळ - अकोला - बडनेरा या ५२६.६५ किलोमिटरच्या रेल्वे लाईनवर १२ रेल्वेगाड्या प्रति तास १३० किलोमिटर एवढ्या वेगाने धावू लागल्या आहेत. तर, इटारसी-नागपूर- वर्धा-बल्लारशाह विभागात - ५०९.०९ किलोमिटर अंतराच्या लाईनवरही या गाड्या १३० च्या स्पीडने धावत आहेत.
कोणत्या मार्गावर किती किलोमिटर इगतपुरी-भुसावळ- बडनेरा विभाग- ५२६.६५ किमी, पुणे-दौंड विभाग- ७५.५९ किमी, इटारसी-नागपूर- वर्धा-बल्लारशाह विभाग- ५०९.०९ किमी आणि दौंड-सोलापूर-वाडी विभाग-३३७.४४ किमी मार्गाचे काम सुरू आहे.
या आहेत १३० च्या स्पीडने धावणाऱ्या गाड्या
१२१११ सीएसएमटी-अमरावती एक्स्प्रेस, १२११२ अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस, १२२९० नागपूर-सीएसएमटी एक्स्प्रेस, १२८६० हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस, १२२८९ सीएसएमटी-नागपूर एक्स्प्रेस, १२८५९ सीएसएमटी-हावडा एक्स्प्रेस, १२१०६ गोंदिया-सीएसएमटी एक्स्प्रेस, १२८१० हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस, १२१०५ सीएसएमटी-गोंदिया एक्स्प्रेस, १२८०९ सीएसएमटी -हावडा एक्स्प्रेस, २२२२१ सीएसएमटी - हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस (इगतपुरी-भुसावळ) आणि २२२२२ हजरत निजामुद्दीन-सीएसएमटी राजधानी एक्स्प्रेस (भुसावळ- इगतपुरी)