कोट्यवधी खर्चूनही सिकलसेल निर्मूलन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:41 AM2018-12-15T10:41:35+5:302018-12-15T10:55:02+5:30
भारतातील एकूण १२ राज्यात सिकलसेल आढळतो. महाराष्ट्रातील सुमारे १९ जिल्हे सिकलसेलने प्रभावित आहेत. विदर्भात याचे सुमारे १.२७ लाख रुग्ण तर २५ लाख वाहक आहेत.
सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतातील एकूण १२ राज्यात सिकलसेल आढळतो. महाराष्ट्रातील सुमारे १९ जिल्हे सिकलसेलने प्रभावित आहेत. विदर्भात याचे सुमारे १.२७ लाख रुग्ण तर २५ लाख वाहक आहेत. यातही पूर्व विदर्भात याचे सर्वाधिक रुग्ण आहेत. परंतु याच भागातील मेयो, मेडिकल व डागा या शासकीय रुग्णालयांमध्ये गर्भजल परीक्षणच होत नाही. परिणामी, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणाºया आजाराच्या निर्मूलनासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करूनही विदर्भातील एकही जिल्हा सिकलसेलमुक्त झाला नाही.
सिकलसेल हा गंभीर आजार आहे. मात्र सोयींबाबत शासन उदासीन असल्याने अनेक कुटुंब अडचणीत येत आहेत. सिकलसेलबाधित मातांच्या गर्भात वाढणाºया जीवाला सिकलसेल आहे का, याचे निदान बालरोगतज्ज्ञ डॉ. दीप्ती जैन यांच्या मार्गदर्शनात २००६मध्ये मेडिकलमध्ये सुरू झाले. २०१२ पर्यंत गर्भजल परीक्षण सुरू होते. परंतु डॉ. जैन यांची बदली होताच चाचणी बंद पडली. दरम्यानच्या काळात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) या चाचणीसाठी आवश्यक असलेले ‘पॉलिमर चेन रिअॅक्शन’ यंत्र उपलब्ध झाले. ही यंत्रणा हाताळण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ मात्र सरकारने उपलब्धच करून दिले नाही. त्यामुळे मेयोचा पॅथालॉजी विभाग आठवड्यातून एक दिवस म्हणजे मंगळवारी विविध रुग्णालयातून येणारे पाच ते सहा गर्भजलाचे नमुने गोळा करतो व चाचणीसाठी मुंबईला पाठवितो. दोन ते अडीच महिन्यांच्या अवकाशानंतर रुग्णाला चाचणीचा अहवाल मिळतो. रुग्ण विदर्भात असताना गर्भजल परीक्षण मुंबईत होत असल्याने शासनाची उदासीनता स्पष्ट होते.
डागात दोन वर्षांपासून यंत्राची प्रतीक्षा
२०१६च्या हिवाळी अधिवेशनात लागलेल्या तारांकित प्रश्नांमध्ये डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात सिकलसेल गर्भजल परीक्षणाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली होती. या केंद्रासाठी आवश्यक असलेली इमारतीची दुरुस्ती व यंत्रसामुग्रीसाठी ५७ लाख मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतु दोन वर्षे होऊनही अद्याप यंत्र उपलब्ध झाले नाही. रुग्णालय प्रशासनाकडून त्याचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र यश आले नाही. महत्त्वाचे म्हणजे, गर्भजल परीक्षण केंद्र चालविण्यासाठी कुशल रेडिओलॉजिस्ट, स्त्रीरोग तज्ज्ञ व पॅथालॉजिस्टची आवश्यक्त असते. जे डागा रुग्णालयाकडे नाही. यामुळे डागाला उपकरण मिळाले तरी या केंद्राला खीळ बसण्याची शक्यता आहे.
मेडिकलमध्ये सिकलसेलची चाचणी बंद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सिकलसेल व थॅलेसिमियाच्या निदानासाठी विकृतीशास्त्र विभागातील ‘एचपीएलसी’ उपकरण कालबाह्य झाले आहे. नवीन उपकरण खरेदी करण्यापेक्षा डागा रुग्णालयाला मिळणारे उपकरण मेडिकलमधील सोयी व विशेषज्ञ लक्षात घेऊन ते वळते करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला. परंतु दीड वर्षे होऊनही प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. गेल्या सहा महिन्यापासून मेडिकलमध्ये सिकलसेलची साधी चाचणीही होत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.