पहिल्यांदाच कोरोनाचा एकही मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:07 AM2021-06-21T04:07:15+5:302021-06-21T04:07:15+5:30
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूसंख्येने उच्चांक गाठला असताना नागपूर जिल्ह्यात रविवारी पहिल्यांदाच कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. मृत्यू ...
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूसंख्येने उच्चांक गाठला असताना नागपूर जिल्ह्यात रविवारी पहिल्यांदाच कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. मृत्यू नोंदविले न जाण्याची या वर्षातील ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे, सलग तीन दिवसात शहर व ग्रामीणमध्ये मृत्यूची नोंद झाली नाही. आज ३९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात शहरातील २६ तर ग्रामीणमधील १३ रुग्ण आहेत. १३४ रुग्ण बरे झाल्याने कोरोनावर मात करणाऱ्यांचा दर ९७.९२ टक्क्यांवर आला आहे.
एप्रिल महिन्यात नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला होता. रुग्णसंख्येसोबतच मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंतेचे वातावरण होते. मात्र प्रशासनाची उपाययोजना व कडक निर्बंधामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव उतरणीला आला. मागील दोन दिवसात शहर व ग्रामीणमध्ये शून्य मृत्यूची नोंद असताना जिल्हाबाहेरील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद होती. परंतु आज शासकीयसह खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात झालेल्या ८८५७ संशयित रुग्णांचे नमुने तपासण्यात आले. यातन ०.४४ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. मृत्यूदर १.८९ टक्क्यांवर आला आहे.
-कोरोनाचे २२८ रुग्ण रुग्णालयात
विविध शासकीयसह खासगी रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये सध्या २२८ रुग्ण उपचार घेत आहेत. ६७९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून ९०७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यात शहरात ८७७ तर ग्रामीणमध्ये ३० रुग्ण आहेत. शहरात आतापर्यंत ३,२६,७४९ तर ग्रामीणमधील १,४०,०८८ असे एकूण ४,६६,८३७ रुग्ण बरे झाले आहेत.
:: कोरोनाची रविवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ८८५७
शहर : २६ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : १३ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४७६७६१
ए. सक्रिय रुग्ण : ९०७
ए. बरे झालेले रुग्ण : ४,६६,८३७
ए. मृत्यू : ९०१७