कुंडली नव्हे, रिपोर्टने जुळणार ‘रेशीमगाठी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:36 AM2017-10-16T00:36:56+5:302017-10-16T00:37:08+5:30

विवाह अर्थातच विश्वासाचे नाते. परंतु जोडीदारातील एकाला दुर्धर आजार जडल्यास संसाराची राखरांगोळी झाल्याची अनेक उदाहरणे बघायला मिळतात.

Not a horoscope, report will match 'silk mathi' | कुंडली नव्हे, रिपोर्टने जुळणार ‘रेशीमगाठी’

कुंडली नव्हे, रिपोर्टने जुळणार ‘रेशीमगाठी’

Next
ठळक मुद्देतास ग्रामपंचायतने घेतला ठराव : विवाहपूर्व एचआयव्ही, सिकलसेल तपासणी

शरद मिरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : विवाह अर्थातच विश्वासाचे नाते. परंतु जोडीदारातील एकाला दुर्धर आजार जडल्यास संसाराची राखरांगोळी झाल्याची अनेक उदाहरणे बघायला मिळतात. आजार लपवून विवाहानंतर त्याचा खुलासा झाल्यास पवित्र नात्यात कटुता निर्माण होते आणि कुटुंबीयांवर मोठा आघात होतो. अशा प्रसंगाची दखल म्हणून सुमारे १५०० लोकसंख्येच्या तास गटग्रामपंचायतने महत्त्वपूर्ण ठराव घेतला आहे. गावातील तरुण-तरुणी जन्म पत्रिका पाहून विवाह बंधनात न अडकता, एचआयव्ही, सिकलसेल तपासणीचे रिपोर्ट कार्ड बघितल्यानंतर रेशीमगाठी जुळणार आहे. ग्रामपंचायतच्या या आगळ्यावेगळ्या ठरावाच्या संकल्पपूर्तीसाठी तास येथील महिलांनी निर्धार केला आहे.
गटग्रामपंचायत तास व सह्याद्री संस्था नागपूर यांच्या संयुक्त प्रयत्नातून ११ आॅक्टोबरला असंख्य गावकºयांच्या उपस्थितीत ‘विवाहपूर्व एचआयव्ही, एड्स व सिकलसेल चाचणी’चा ठराव घेण्यात आला. या गटग्रामपंचायत अंतर्गत मोखाळा गावाचाही समावेश आहे. १५ आॅगस्ट या स्वातंत्र्यदिनी व गांधी जयंतीला झालेल्या ग्रामसभेत सदर विषय ठेवण्यात आला होता. हा ठराव सर्वानुमते पारित झाल्यानंतर त्याची गावात १०० टक्के अंमलबजावणी करण्यासाठी प्रारंभी सह्याद्री संस्था, ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील तरुणांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले.
दरम्यान, ११ आॅक्टोबरला ग्रामपंचायतमध्ये झालेल्या एका सभेत ‘आधी एचआयव्ही, एड्स व सिकलसेलची चाचणी आणि त्यानंतर लग्न’ असा संकल्प ग्रामस्थांनी केला आणि तास गावामध्ये नव्या आदर्शाच्या पाऊलखुणा उमटण्यास सुरुवात झाली. यावेळी सरपंच युवराज शंभरकर, उपसरपंच वर्षा ढोणे, ग्रामविकास अधिकारी ए.डी. गजघाटे, विभागीय पर्यवेक्षक रुपाली सदावर्ती, जिल्हा साधन व्यक्ती नंदू सातपुते, ग्रामीण रुग्णालयाचे एचआयव्ही समुपदेशक ओमप्रकाश पोटभरे, सारिका मेश्राम, संगीता मेश्राम आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थितांना एचआयव्ही, एड्स व सिकलसेलबाबत सखोल माहिती देऊन ठरावाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय सदर ठरावाची प्रत शासनाच्या एड्स नियंत्रण संस्था मुंबई व नागपूर जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाला पाठविण्यात आली.
सह्याद्रीतर्फे गौरव
सह्याद्री संस्थेने यासाठी प्रयत्न केले असले तरी याबाबतचा ठराव पारित करणे व त्यांच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतने घेतलेला पुढाकार व त्यास ग्रामस्थांनी दिलेला प्रतिसाद हा मोलाचा आहे. हा ऐतिहासिक ठराव ग्रामपंचायतने एकमताने पारित केल्याबद्दल सह्याद्रीतर्फे ग्रामपंचायत पदाधिकाºयांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
कौटुंबिक कलह थांबतील
अशा प्रकाराचा ऐतिहासिक ठराव घेणारी तास गटग्रामपंचायत पहिलीच ठरली आहे. एचआयव्हीमुळे विवाहानंतर हातावरील मेहंदी निघण्यापूर्वीच संसाराची राखरांगोळी होते. यामध्ये जोडीदारापैकी कुणीही जबाबदार असू शकतो. त्यामुळे तळहातावरील रेषा बघून, जन्म पत्रिका बघितल्यानंतर विवाह बंधनात अडकण्यापेक्षा एचआयव्ही, एड्स, सिकलसेल तपासणीचे रिपोर्ट कार्ड बघून विवाहाच्या रेशीमगाठी जुळल्यास कौटुंबिक कलह थांबतील, अशा प्रतिक्रिया सरपंच युवराज शंभरकर, उपसरपंच वर्षा ढोणे, ग्रामसेवक ए. डी. गजघाटे, एचआयव्ही समुपदेशक ओमप्रकाश पोटभरे यांनी व्यक्त केल्या.

Web Title: Not a horoscope, report will match 'silk mathi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.