भिडेच नाही तर संविधानाच्या विरोधात वागणाऱ्यांवर निर्बंध घालू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 10:29 PM2018-07-11T22:29:15+5:302018-07-11T22:34:56+5:30
पुणे जिल्ह्यातील वडू येथील संभाजी महाराजांचे स्मारक आणि कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसराच्या विकासासाठी २५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. गरज भासल्यास त्याहून अधिक निधी लागला तरी तो देण्यात येईल, अशी हमी देतानाच संभाजी भिडेच नाही, तर संविधानाच्या विरोधात वागणाऱ्या कुणावरही बंधने आणली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: पुणे जिल्ह्यातील वडू येथील संभाजी महाराजांचे स्मारक आणि कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसराच्या विकासासाठी २५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. गरज भासल्यास त्याहून अधिक निधी लागला तरी तो देण्यात येईल, अशी हमी देतानाच संभाजी भिडेच नाही, तर संविधानाच्या विरोधात वागणाऱ्या कुणावरही बंधने आणली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
कोरेगाव भीमा दंगलीच्या चौकशीबाबत व मुलीच्या हत्येबाबत अॅड. जयदेव गायकवाड,शरद रणपिसे, भाई जगताप, जनार्दन चांदूरकर, प्रा. जोगेंद्र कवाडे आदींनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावरील चर्चेत मुख्यमंत्र्यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली.
पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दोन्ही जागांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहे. या जागांची नोंदणी शासनाच्या सातबारावर करण्यात आलेली आहे. भिडे यांनी संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्यासंदर्भात केलेले वक्तव्य तपासून आवश्यक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली .शरद रणपिसे यांनी ३१ जुलैपूर्वी अहवाल न्यायालयीन चौकशी आयोगाकडून मागवणार काय, असा सवाल केला. त्यावर मुदत १५ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे त्यानंतरच अहवाल मागवता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. प्रकाश गजभिये यांनी देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा होत आहे. यात साक्ष नोंदविण्याला मुदवाढ देण्याची मागणी केली. गरज भासल्यास ती वाढविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
एल्गार परिषदेशी नक्षलवाद्यांचा संबंध असण्याबाबत नेमकी काय स्थिती आहे, या संबंधात नागपूरपासून मुंबईपर्यंत अनेकांना अटक करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाची सद्यस्थिती काय आहे, असे नीलम गोऱ्हे यांनी विचारले. त्यावर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. पोलीस विहीत कालावधीत आरोपपत्र दाखल करतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कोरेगाव भीमा प्रकरणाशी संबंध नसलेल्या अनेकांना अटक करण्यात आली, याकडे कपिल पाटील यांनी लक्ष वेधले. भिडे यांच्यावर दंगलीचे आरोप झाल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी एल्गार परिषदेच्या सदस्यांचा नक्षलवाद्यांशी संबंध जोडण्यात आल्याचा आरोप प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केला.
यावर मुख्यमंत्री म्हणाले, एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या अनेकांचे सक्रिय नक्षल्यांशी संबंध असल्याचे थेट पुरावे मिळाले आहेत. एक नाही, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे मिळालेले आहेत. सुनील तटकरे यांनी कोरेगाव भीमा घटनेसंदर्भात तपासाचे निष्कर्ष नेमके काय आहेत, असा प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणातील पीडितांना नऊ कोटींची मदत यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. चौकशी सुरू असल्याने निष्कर्ष आताच सांगता येणार नाही.
याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी पूजा सकटची हत्या झाली, त्यासंदर्भात सदस्यांनी उपप्रश्न विचारले. त्यावर सुरेश सकट यांचा घरासंदर्भात पूर्वीपासून काही जणांशी वाद होता. पूजाची हत्या झाली नसल्याचे सकृतदर्शनी पुराव्यांवरून निदर्शनास आले आहे. ती घटनेची प्रत्यक्षदर्शी नसून जयदीप सकट हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. पूजाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयावरून दोन जणांना अटक करण्यात आली असून कुणाचीही गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या सदस्यांनी संभाजी भिडे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी वेलमध्ये येऊन घोषणा सुरू केल्या. गोंधळामुळे सभापतींनी दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.
आंबा खाऊन मुली का होत नाही
आंबा खाऊन मुले होतात, असे संभाजी भिडे म्हणाले होते. आंबे खाऊन मुली का होत नाही, असा सवाल विद्या चव्हाण यांनी केला. म्हणजे मुलींना त्यांचा विरोध आहे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर भिडेंच्या आंब्यांवर काँग्रेसचे भाई जगताप यांनी काजूचा उतारा दिला. ‘आंबे आंबे काय म्हणता, आमच्या कोकणात या, काजू दाखवतो. आंब्यांपेक्षा काजू चांगले आहेत', असे जगताप म्हणताच सभागृहात हंशा पिकला.