शेतकरी नव्हे केवळ एक कुटुंबच मजबूत झाले : राधामोहन सिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:36 PM2018-11-23T22:36:27+5:302018-11-23T22:39:59+5:30
‘अॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह कृषी विकास व तंत्रज्ञान यांच्यावर भाष्य करतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात त्यांनी राजकीय स्वरूपाच्या भाषणावरच जास्त भर दिला. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेतकऱ्यांऐवजी केवळ एक कुटुंबच मजबूत झाले, असा आरोप करत अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘अॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह कृषी विकास व तंत्रज्ञान यांच्यावर भाष्य करतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात त्यांनी राजकीय स्वरूपाच्या भाषणावरच जास्त भर दिला. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेतकऱ्यांऐवजी केवळ एक कुटुंबच मजबूत झाले, असा आरोप करत अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.
विदर्भाचा भाग हा शेतकरी आत्महत्यांसाठीच चर्चेत होता. मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून केवळ एकाच कुटुंबाला मजबूत करण्याचे प्रयत्न झाले. जर काही चांगले काम केले असते, तर शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्या. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींवर २००७ मध्येच अंमलबजावणी व्हायला हवी होती. मात्र तसे झाले नाही. आता मोदी सरकार त्याला लागू करत आहे, तेव्हा विरोधकांना शेतकरी आठवत आहेत. देशाचे राजकुमार मागील १० वर्षांपासून कुठल्या खाटेवर झोपले होते, असा प्रश्न उपस्थित करत संपुआ शासनाने लक्ष न दिल्याने शेतकऱ्यांची दुरवस्था झाली असल्याचा आरोप त्यांनी लावला. विरोधक नोटाबंदीमुळे शेतकरी अडचणीत आल्याचे आरोप करत आहेत. मात्र नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना कुठलीही समस्या निर्माण झाली नाही. प्रत्यक्षात नोटाबंदीमुळे बँकांमध्ये पैशांचा ओघ वाढला व शेतकरी हिताच्या विविध योजनांची मजबूतपणे अंमलबजावणी झाली. नोटाबंदीमुळे काही विशिष्ट लोकांचे नुकसान नक्कीच झाले व ते आज जामिनावर फिरत आहेत, असा टोला त्यांनी मारला. संपुआ सरकारच्या काळापेक्षा कृषीक्षेत्रातील अर्थसंकल्पीय तरतूद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाराष्ट्रात फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने अनेक सकारात्मक पावले उचलली आहेत. नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला नेहमीच फायदा होतो व त्यांचे ‘व्हिजन’ नवी दिशा दाखविणारे असते, असेदेखील राधामोहन सिंह म्हणाले.
मराठवाड्यातील मुख्यमंत्र्यांनी काय केले ?
काही वर्षांअगोदर लातूरमध्ये अक्षरश: रेल्वेगाड्यांतून पिण्याचे पाणी आणण्यात आले होते. आश्चर्याची बाब म्हणजे लातूर व आजूबाजूच्या परिसराने महाराष्ट्राला चार मुख्यमंत्री दिले. मात्र त्यांनी एक विशिष्ट कुटुंब, पक्ष आणि स्वत:च्याच फायद्यावर भर दिला. जलसंवर्धनाकडे दुर्लक्षच केले. परिणामी चार मुख्यमंत्री देऊनदेखील लातूरच्या नशिबी अशी स्थिती आली, अशी टीका राधामोहन सिंह यांनी केली.