राजनेता नव्हे, जनसहभागातून भारत बनेल विश्वगुरू : आनंद कुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 11:33 PM2020-01-02T23:33:46+5:302020-01-02T23:35:19+5:30
प्रत्येक नागरिकाच्या सहभागातूनच भारत पुन्हा विश्वगुरू बनेल, असा विश्वास पटणा, बिहारचे ‘सुपर ३०’चे संस्थापक आनंद कुमार यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारताचा इतिहास अतिशय संपन्न आहे. त्या इतिहासाचे अवलोकन केल्यास आपले भविष्य खूप उज्ज्वल आहे, असे जाणवेल. परंतु एखादा राजकारणी येऊन आपल्या देशाला महासत्ता बनवेल, हा विचार मनातून काढून टाका. एखादा नेता फारतर सहकार्य करेल पण प्रयत्न प्रत्येकालाच करायचे आहेत. प्रत्येक नागरिकाच्या सहभागातूनच भारत पुन्हा विश्वगुरू बनेल, असा विश्वास पटणा, बिहारचे ‘सुपर ३०’चे संस्थापक आनंद कुमार यांनी व्यक्त केला.
सेवासदन शिक्षण संस्थेच्या ९३ व्या वर्धापन दिननिमित्त विदर्भस्तरीय रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्कार समारोहाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले. यावेळी आनंद कुमार बोलत होते. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून यंदा हा पुरस्कार श्री मंगल बहुउद्देशीय शिक्षण, तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेद्वारा संचालित सावनेरच्या मूकबधिर निवासी शाळा या संस्थेला देण्यात आला. ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी गोयल गंगा ग्रुपचे संचालक अतुल गोयल, आमदार नागो गाणार, सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी, सचिव इंदूबाला मुकेवार, पुरस्कार समितीच्या कार्याध्यक्षा वासंती भागवत, पुरस्कारप्राप्त संस्थेचे संस्थापक नारायण समर्थ प्रामुख्याने उपस्थित होते.
आनंद कुमार यांनी पुढे बोलताना, १०, २०, ३० वर्षात एक वेळ येईल जेव्हा भारत विश्वगुरू बनेल आणि युरोप, अमेरिकेचेही लोक नागपूरसह भारतात शिक्षण आणि येथील रुग्णालयात उपचारासाठी येतील. त्यासाठी प्रत्येकाचा सहभाग आवश्यक आहे. रमाबाई रानडे यांनी १०० वर्षापूर्वी शिक्षणाचे महत्त्व ओळखून महिलांच्या शिक्षणासाठी कार्य केले, म्हणून आज असंख्य महिला पुढे जात आहेत. सेवासदन किंवा पुरस्कार घेणाऱ्या श्री मंगल संस्थेसारख्या अनेक संस्था, असंख्य लोक समाजाच्या उत्थानासाठी कार्य करीत आहेत. अशा संस्थांना, लोकांना प्रोत्साहित करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. केवळ प्रोत्साहन देऊन होणार नाही तर स्वत: त्या कामात सहभागी व्हा. देशात आजही दलित, वंचित, मागासवर्गीय मुले, महिला शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर आहेत. अशा गरजवंतांसाठी वेळ काढून थोडे कार्य करा. प्रत्येक मुलांवर विश्वास ठेवा, त्यांच्यात डॉक्टर, वैज्ञानिक, नोबेल प्राप्त करण्याच्या संभावना आहेत. हे काम करताना अनेक अडचणी येतील, पण धैर्याने, संयमाने काम करीत राहिल्यास यश मिळेल व भारत महासत्ता होईल,असे आवाहन आनंद कुमार यांनी केले.
यावेळी अतुल गोयल यांनी, रमाबाई रानडे यांच्या कार्याचे कौतुक केले. ज्या समाजात महिलांना सन्मान मिळतो, तो समाज आणि देश समृद्ध होतो. मात्र पुरुषप्रधान मानसिकतेचा देश महासत्ता बनू शकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. शिक्षणाचे बाजारीकरण झालेल्या काळात आनंद कुमार यांच्यासारख्या शिक्षकांची गरज आहे. मात्र आता शिक्षकांमध्ये नैतिकतेचा अभाव दिसून येत असल्याची खंत व्यक्त करीत या कामात साधनेचा भाव येईपर्यंत आपण महाशक्ती बनू शकत नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांचन गडकरी यांनी केले तर संचालन आशुतोष अडोणी यांनी केले.
गडकरी दाम्पत्याचे कौतुक
आनंद कुमार यांनी यावेळी देशभरात हायवेचे जाळे पसरविणारे नितीन गडकरी सर्वाधिक कार्यक्षम मंत्री असल्याची भावना व्यक्त केली. मात्र महिलांना सक्षम करण्यासाठी झटणाऱ्या कांचन गडकरी यांचे कार्य त्यांच्यापेक्षा महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. मराठी लोक बिहारी माणसांना पळवून लावतात, असे बोलले जाते पण नागपुरात माझे नेहमी प्रेमाने स्वागत झाले, त्यामुळे मला असे जाणवत नाही, असे बोलताच सभागृहात हंशा पिकला.