दुपट्टा नव्हे, हेल्मेट वापरा
By admin | Published: February 23, 2016 03:23 AM2016-02-23T03:23:17+5:302016-02-23T03:23:17+5:30
चेहऱ्यावर दुपट्टा बांधण्यापेक्षा, हेल्मेट वापरा असा संदेश देत सोमवारी वाहतूक पोलिसांनी सुमारे १६२ दुचाकीचालकांवर
नागपूर : चेहऱ्यावर दुपट्टा बांधण्यापेक्षा, हेल्मेट वापरा असा संदेश देत सोमवारी वाहतूक पोलिसांनी सुमारे १६२ दुचाकीचालकांवर कारवाई केली. शहरात हेल्मेटला घेऊन सक्तीची कारवाई सुरू नसली तरी जनजागृती म्हणून ही मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
हेल्मेटसक्तीला घेऊन नागपुरात २००५ नंतर पहिल्यांदाच एकाच दिवशी ७ हजार २६३ वाहनचालकांवर कारवाई झाली. परंतु हेल्मेट विकत घेण्यासाठी वेळ न देता कारवाई सुरू केल्याची ओरड झाल्याने व हेल्मेटच्या काळाबाजाराला आलेला ऊत पाहून काही दिवस कारवाई शिथिल करण्यात आली. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा कारवाईला वेग आला आहे. सोमवारी वर्धा रोड, महाराजबाग रोड, धरमपेठ रोड, सीताबर्डी, सदर या परिसरात चेहऱ्याला दुप्पटा बांधून दुचाकी चालविणाऱ्यांना थांबविण्यात आले. त्यांना दुपट्ट्याऐवजी हेल्मेट घाला. हेल्मेटमुळे चेहऱ्यासोबतच जीवाचीही सुरक्षा होईल, असे समुपदेशन करीत चालान फाडले. दिवसभरात १६२ चालकांवर ही कारवाई करण्यात आली. हेल्मेटसोबतच पोलिसांनी सीटबेल्ट, सिग्नल जम्पिंग, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, फॅन्सी नंबरप्लेट अशा दोषी आढळून आलेल्या वाहनचालकांवरही कारवाई केली. हा कारवाईचा आकडा हजारावर असल्याची माहिती आहे. एका अधिकाऱ्याने रोज साधारण १०० दुचाकीस्वारांवर हेल्मेटची कारवाई होत असल्याचे सांगितले. सध्या वाहतूक विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी रजेवर आहेत. यामुळे १ मार्चपासून सक्तीची कारवाई होणार असल्याची सूत्राची माहिती आहे. (प्रतिनिधी)