गेल्या १० वर्षांत झाले नाही गंगाजमुना वस्तीतील एकाही वारांगनेचे पुनर्वसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2021 08:00 AM2021-10-02T08:00:00+5:302021-10-02T08:00:17+5:30
Nagpur News पाेलिसांनी गंगाजमुना वस्तीतील वारांगनावर कारवाई तर केली पण गेल्या १० वर्षांत एकीचेही पुनर्वसन करू शकले नाही.
नागपूर : गंगाजमुना वस्तीतील वेश्या व्यवसाय बंद करण्यासाठी पाेलिसांची दंडुकेशाही सुरू आहे. ‘तुम्ही हा व्यवसाय बंद करा, आम्ही दुसरा राेजगार देऊ’, अशा गप्पा केल्या जात आहेत. मात्र या बाता किती फाेल आहेत, याचे सत्य पाेलिसांनीच उजेडात आणले व तेही आरटीआयमधून. पाेलिसांनी वारांगनावर कारवाई तर केली पण गेल्या १० वर्षांत एकीचेही पुनर्वसन करू शकले नाही. (Not a single prostitute in Gangajmuna has been rehabilitated in the last 10 years)
गेल्या दाेन महिन्यांपासून गंगा जमुना वस्तीत पाेलिसांचा ससेमिरा चालला आहे. वस्ती सील करण्यात आली व येथील महिलांचा व्यवसाय बंद करण्यात आला. आधीच लाॅकडाऊनमुळे उपासमार सहन करणाऱ्या वारांगनाना जगण्याचा प्रचंड संघर्ष करावा लागताे आहे. अशात पाेलीस आणि राजकीय नेत्यांकडून आश्वासनांचे गाजर दिले जात आहे. ‘व्यवसाय बंद करा, आम्ही राेजगार देऊ, आर्थिक मदत देऊ, चांगले जीवन देऊ’, असे काय काय आणि किती किती दावे. मात्र पाेलीस असाे वा कुणीही, या महिलांना नाहीच काढू शकले या नरकातून बाहेर.
मागील १० वर्षांत पाेलिसांनी कारवाई करीत २३६ महिलांना या वस्तीतून रेस्क्यू केले. त्यांना सुधारगृहात टाकले पण पुढे काय झाले? किती महिलांना या ‘धंद्या’तून बाहेर काढले, कितींचे पुनर्वसन केले? पाेलिसांना याची काही माहिती नाही. हाेय, या सर्वच्या सर्व महिलांना पुढे त्याच बदनाम वस्तीत परतावे लागले. इलाज नव्हता. पाेटाची भूक आणि कुटुंबाच्या गरजांनी त्यांना यावेच लागले परत. संघर्ष वाहिनीचे सामाजिक कार्यकर्ते दीनानाथ वाघमारे यांनी आरटीआयमधून ही माहिती प्रकाशात आणली.