श्रद्धांजली सभा नाही, मात्र सेवानिवृत्त होणाऱ्यांचा कार्यगौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:11 AM2021-08-27T04:11:36+5:302021-08-27T04:11:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्राच्या विभागप्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांच्या मृत्यूनंतर प्रशासनातर्फे अधिकृतपणे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्राच्या विभागप्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांच्या मृत्यूनंतर प्रशासनातर्फे अधिकृतपणे साधी श्रद्धांजली सभादेखील घेण्यात आलेली नाही. दुसरीकडे नियमांचे उल्लंघन करत सेवानिवृत्त होणाऱ्या लोकप्रशासन विभागातील प्रमुख डॉ. निर्मलकुमार सिंह यांच्या कार्यगौरव समारंभाला मात्र विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. या प्रकारामुळे विद्यापीठ वर्तुळात नाराजीचा सूर आहे.
डॉ. मेश्राम यांच्या मृत्यूनंतर विद्यापीठाने अधिकृतपणे श्रद्धांजली सभा घेतली नाही. यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, कुठलाही कर्मचारी किंवा प्राध्यापक सेवानिवृत्त होणार असेल तर त्या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात होईल, असे माजी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्या कार्यकाळात जाहीर करण्यात आले होते. मात्र या नियमाला डावलून लोकप्रशासन विभागात डॉ. सिंग यांच्या सेवानिवृत्तीसंदर्भात कार्यगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. असे आयोजन करण्यासाठी विद्यापीठाची परवानगी घ्यावी लागते. परंतु कार्य गौरव आणि सत्कार समारोह समिती नागपूर व मानव्यशास्त्र विद्या शाखेच्या वतीने बुधवारी मानव्यशास्त्र विभागामध्ये हा कार्यक्रम आयोजिला होता. डॉ. सिंग हे ३० ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्याविरोधात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. असे असतानादेखील संबंधित कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे व इतर अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.