गणवेशाचे खरे नाही; पुस्तके मात्र पहिल्याच दिवशी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2023 09:08 PM2023-05-30T21:08:50+5:302023-05-30T21:09:40+5:30
Nagpur News नवीन शैक्षणिक सत्र २६ जूनपासून सुरू होत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार किंवा नाही, याबाबत संभ्रम आहे.
नागपूर : नवीन शैक्षणिक सत्र २६ जूनपासून सुरू होत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार किंवा नाही, याबाबत संभ्रम आहे. मात्र, पाठ्यपुस्तके पहिल्याच दिवशी प्राप्त होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था, मनपा, खासगी, अनुदानित व जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना यंदा एकात्मिक पाठ्यपुस्तके योजनेंतर्गत सर्व विषयांकरिता एकच पुस्तक राहणार असून ते चार भागांत राहणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी होणार आहे. पाठ्यपुस्तकांचा पुरवठा झाला असून जिल्हास्तरावरून तालुकास्तरावर पाठ्यपुस्तकांचे वितरणही सुरू आहे. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सुमारे तीन लाखांवर विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके मिळतील, असे नियोजन आहे.
शासनाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी पहिली ते आठवीच्या मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू आणि सेमी इंग्रजी माध्यमांच्या मुलांना मोफत पुस्तके दिली जातात. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांच्या हाती मोफत पुस्तके मिळावीत, यासाठी जि.प. शिक्षण विभागाने नियोजन करून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे पुस्तकांसाठी ऑनलाइन नोंदणी केली होती.
शिक्षण विभागाकडून २०२१-२२ च्या यूडायएस नोंदीनुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या एक लाख ६४ हजार विद्यार्थ्यांसाठी आणि महापालिकेकडून शहरातील सुमारे एक लाख ५८ हजार विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तकांकरिता ऑनलाइन नोंदणी केली. त्यानुसार बालभारतीने पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला आहे.
तालुकास्तरावर विस्तार अधिकाऱ्यांवर जबाबदारी
तालुकास्तरावरून शाळांना पुस्तकांचा पुरवठा केला जाणार आहे. पाठ्यपुस्तकाच्या वितरणाची जबाबदारी शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मागणीप्रमाणे पाठ्यपुस्तकाची उचल बालभारतीकडून करण्यात येत आहे. आजवर नागपूर (ग्रामीण), उमरेड, भिवापूर, कामठी आणि हिंगणा या तालुक्यांमध्ये पाठ्यपुस्तके मागणीनुसार पोहाेचली आहेत.
चारही पुस्तकांचे वितरण करणार
वर्षभरासाठी सर्व विषयांचे चार पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहे. यापैकी दोन पुस्तके हे दिवाळीपूर्वीच्या अभ्यासक्रमाचे आणि दोन पुस्तके हे दिवाळीनंतरच्या अभ्यासक्रमाची राहणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना चारही पुस्तकांचे वितरण होणार आहे.