आम्ही नव्हे, धीरेंद्र कृष्ण महाराजच हिंदू धर्म विरोधी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2023 10:27 PM2023-01-18T22:27:11+5:302023-01-18T22:27:38+5:30
Nagpur News आम्ही नव्हे तर हे महाराजच सनातन हिंदू धर्माचे नुकसान करीत असल्याचा आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व राज्य शासनाच्या जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती, प्रचार आणि प्रसार समितीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी आज येथे केला.
नागपूर : मध्य प्रदेशातील बागेश्वरधामचे गदाधारी धीरेंद्र कृष्ण महाराज हेच सर्वसामान्य हिंदूंची फसवणूक करतात. स्त्रियांच्या चारित्र्याचे हनन करतात आणि आस्थेला अंधश्रद्धेत बुडवित असल्याचा आरोप करत, आम्ही नव्हे तर हे महाराजच सनातन हिंदू धर्माचे नुकसान करीत असल्याचा आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व राज्य शासनाच्या जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती, प्रचार आणि प्रसार समितीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी आज येथे केला.
अ.भा. अंनिसच्यावतीने रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित ‘धीरेंद्र महाराजांच्या दिवशक्तीचा भांडाफोड’ या व्याख्यानात श्याम मानव बोलत होते. अध्यक्षस्थानी अ.भा. अंनिसचे नागपूर अध्यक्ष प्रा. शरद पाटील तर व्यासपीठावर राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे, महासचिव हरिश देशमुख आणि राज्य सचिव प्रशांत सपाटे उपस्थित होते.
मध्यप्रदेशातील बागेश्वर धामचे गदाधारी धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या रामकथेचे आयोजन नागपुरात रेशीमबाग मैदानावर नुकतेच झाले. दरम्यान दोन दिवस त्यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या ‘दिव्यदरबार’ व ‘प्रेतदरबार’ भरवला होता. त्यावर दरबार सिद्ध करा आणि ३० लाख रुपये मिळवा, असे आवाहन केले. परंतु, आपला नियोजित कार्यक्रम पूर्ण होण्याआधी त्यांनी येथून पळ काढला आहे. आता त्यांनी पळ काढला की त्यांना पळविण्यात आले, हा संशयाचा मुद्दा आहे. कारण, या प्रकाराची पूर्णत: तपासणी व छाननी केल्यानंतर जादूटोणा विरोधी अंमलबजावणी समितीचे नागपूरचे दक्षता अधिकारी असलेल्या एसीपी क्राईम यांच्याकडे तक्रार दाखल केल्यावरही आणि महाराज पळून गेल्यावरही त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. उलट ‘तुम्ही समाजिक भावना दुखावू नका’ अशा आशयाची नोटीस जारी झाल्याचे श्याम मानव यावेळी म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही अंनिसला अघोषित पाठिंबा!
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनीही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासाठी अघोषित पाठिंबा दिला होता. ‘आमच्या घरातील साप पाहुण्यांनी मारले तर चांगलेच आहे’ अशी भावना त्यांनी व्यक्त केले होते. संघाकडून कधीच अ.भा. अंनिसच्या कार्याला विरोध झालेला नाही, असेही प्रा. श्याम मानव यावेळी म्हणाले.
सभेनंतर विरोध प्रदर्शन
- जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमानंतर लागलीच काही युवकांनी प्रा. श्याम मानव यांना हिंदू धर्म विरोधी म्हणत, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे, काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होतेे. पोलिसांनी लगेचच त्यांना ताब्यात घेतले.
............