राजकीय पक्षांशी नव्हे, आपची आघाडी १३० कोटी जनतेशी; केजरीवालांनी धुडकावली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 11:39 AM2022-05-09T11:39:53+5:302022-05-09T11:40:06+5:30

केजरीवाल यांनी ‘लोकमत’च्या मंचावर मांडला विकासाचा अजेंडा

Not with political parties, your alliance with 130 crore people!; AAP Arvind Kejariwal in Lokmat Event Nagpur | राजकीय पक्षांशी नव्हे, आपची आघाडी १३० कोटी जनतेशी; केजरीवालांनी धुडकावली चर्चा

राजकीय पक्षांशी नव्हे, आपची आघाडी १३० कोटी जनतेशी; केजरीवालांनी धुडकावली चर्चा

Next


लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी जिंकण्यासाठी किंवा कुणाला पराभूत करण्यासाठी आघाडी करणार नाही. आमचे ध्येय देशाचा विजय हे असून त्यासाठी आमची आघाडी देशातील १३० कोटी जनतेशी आहे, असे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी राजकीय आघाडीची चर्चा धुडकावून लावली.

‘लोकमत’ नागपूर आवृत्तीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित विविध उपक्रमांच्या मालिकेत रविवारी केजरीवाल यांनी ‘आम आदमी पार्टी व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची भूमिका’ या विषयावर मत मांडले. रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, ‘आप’चे राष्ट्रीय प्रवक्ते व खासदार राघव चड्ढा, ‘लोकमत एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य  विजय दर्डा, ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, ‘लोकमत’चे संचालक (परिचालन) अशोक जैन, ‘लोकमत समाचार’चे संपादक विकास मिश्रा, ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक श्रीमंत माने आणि ‘लोकमत टाइम्स’चे संपादक एन. के. नायक उपस्थित होते. विजय दर्डा यांनी प्रास्ताविक केले. श्वेता शेलगावकर यांनी संचालन केले, तर देवेंद्र दर्डा यांनी आभार मानले.

अरविंद केजरीवाल म्हणाले...
nदेशातील एक मोठा पक्ष आजकाल गुंडांना सदस्य बनवत आहे. बलात्काऱ्यांची मिरवणूक काढण्यात येत असून त्यांचे सत्कार सुरू आहेत.  ज्यांना भ्रष्टाचार, गुंडागर्दी हवी आहे त्यांनी त्यांच्यासोबत जावे. ज्यांना विकास, प्रामाणिकपणा व देशभक्ती हवी आहे, त्यांनी आमच्यासोबत यावे. 
nमाझा देवावर पुरेसा विश्वास आहे.  भारत जगात पहिल्या क्रमांकाचा देश बनावा. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत मला देवाने मरण देऊ नये. नेत्यांना मोफत उपचार, मोफत विजेची सुविधा आहे, परंतु जनतेला मोफत उपचार, मोफत वीज, मोफत शिक्षण दिले तर विरोधक प्रश्न विचारतात. 

दंगली घडवता येत नाहीत...
मी किंवा माझे सहकारी सत्तेसाठी राजकारणात उतरलेलो नाही. आम्हाला भ्रष्टाचार करणे, दंगली घडवून आणणे या गोष्टी येतच नाहीत. राजकारणही जमत नाही.  आम्हाला फक्त जनतेची कामे करता येतात, शाळा-इस्पितळे बांधता येतात.     - अरविंत केजरीवाल

लोकशाहीवर मोकळेपणाने 
चर्चा व्हावी : विजय दर्डा

लोकशाहीवर आजवर मोकळेपणे चर्चा झालेली नाही. पक्षांना सत्ता ही राजकारणासाठी हवी असते, की लोककल्याणासाठी हे जनतेला जाणून घेण्यात स्वारस्य असते. त्यामुळे लोकशाहीवर मोकळेपणाने चर्चा व्हावी, अशी अपेक्षा लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केली. 

पंजाब भ्रष्टाचार व नशामुक्त करणार
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ‘नव्या पंजाबसमोरील आव्हाने’ या विषयावर आपली भूमिका मांडली. भ्रष्टाचार ही पंजाबमधील सर्वांत मोठी समस्या आहे. आम्ही ‘अँटी करप्शन हेल्पलाइन’ सुरू केली आहे. जर कुणी सरकारी अधिकाऱ्याने लाच मागितली तर जनतेने त्याचा व्हिडिओ पाठवावा व त्यावर कारवाई होईल, अशी ती यंत्रणा आहे. यामुळे अनेकांना वचक बसला असून सरकारी अधिकाऱ्यांनी ‘लाच देणे पाप आहे’ असे फलकच कार्यालयात लावल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Not with political parties, your alliance with 130 crore people!; AAP Arvind Kejariwal in Lokmat Event Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.