जे ५० वर्षांत नाही, ते दोन वर्षांत झाले
By admin | Published: May 28, 2016 03:00 AM2016-05-28T03:00:59+5:302016-05-28T03:00:59+5:30
गेल्या दोन वर्षांत केंद्र सरकारने राज्याला जी मदत केली, एवढी मोठी मदत मागील ५० वर्षांत कधीच केली नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : आरोग्य महाशिबिराचा ३० हजार रुग्णांना लाभ
नागपूर : गेल्या दोन वर्षांत केंद्र सरकारने राज्याला जी मदत केली, एवढी मोठी मदत मागील ५० वर्षांत कधीच केली नाही. म्हणूनच आज सर्वत्र विकासाचे पर्व सुरू आहे. विदर्भाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मिहानसाठी गेल्या १५ वर्षांत साध्या जागेचा मार्ग मोकळा झाला नव्हता ते भाजपाने दोन वर्षांत शक्य करून दाखविले आहे. मिहानच्या विकासासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून हस्तांतरित होणारी जागा लवकरच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला मिळणार आहे. येत्या १५ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा वाढदिवस व केंद्र शासनाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातर्फे बी. आर. ए. मुंडले शाळेत आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय कायदा मंत्री डी.व्ही.सदानंद गौडा, केंद्रीय पंचायत राज विभागाचे राज्यमंत्री निहालचंद मेघवाल, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, माजी खासदार दत्ता मेघे, महापौर प्रवीण दटके, भाजपाचे शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे, आ. सुधाकर देशमुख, आ. विकास कुंभारे, उपमहापौर सतीश होले, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, खासगीतील महागडे उपचार सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे बोलले जाते. यामुळे राज्यातील एकही गरीब रुग्ण उपचाराविना राहू नये यासाठी शासन मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचा विचार करीत आहे. मुख्यमंत्री कार्यालयात एक आरोग्य कक्ष उघडला आहे. या माध्यमातून गेल्या एक वर्षात १८० कोटी रुपये रुग्णांच्या उपचारावर खर्च करण्यात आले.
दोन वर्षात केंद्र शासनाने भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक व गतिशील शासन देशाला दिले आहे. गडचिरोली रेल्वेसाठी जे १५ वर्षांत जमले नाही ते पंतप्रधान मोदींनी एका बैठकीत साध्य केले. महाराष्ट्रातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी सर्वाधिक मदत केलेली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.(प्रतिनिधी)
दोन वर्षांत ८० हजार कोटींचा महसूल
मिळाल्याचे केंद्रीय कायदामंत्री गौडा म्हणाले, केंद्राच्या उपाययोजनांमुळे अवघ्या दोन वर्षांत देशाला ८० हजार कोटींचा महसूल करस्वरूपात मिळाला. अशा शिबिरांतून भाजपाचे काम दिसून येते. यावेळी राज्यमंत्री निहालचंद, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, पद्मविभूषण डॉ. कांतिलाल संचेती, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी आपले विचार मांडले. प्रास्ताविक शिबिराचे संयोजक संदीप जोशी यांनी केले. आभार विवेक तरासे यांनी मानले. शिबिराचे सहसंयोजक प्रकाश भोयर उपस्थित होते. या आरोग्य महाशिबिराचा ३० हजार रुग्णांनी लाभ घेतला.
डॉक्टरांचा सत्कार
कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पद्मविभूषण डॉ. कांतिलाल संचेती, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, डॉ. सुलतान प्रधान, डॉ. शेखर भोजराज, डॉ. रणजित जगताप, डॉ. संजय ओक, डॉ. अजय चंदनवाडे, डॉ. सीमा पुणतांबेकर, डॉ. अशोक कृपलानी, डॉ. अभय सत्रे, अजय चौरासिया, कैलास शर्मा, एन. एल. सराफ, डॉ. रागिणी पारेख, डॉ. वर्षा बागुल आदींचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.