नागपूर शहरातील १२ मोठ्या हॉटेलांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 09:42 PM2019-01-01T21:42:23+5:302019-01-01T21:49:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : घराघरातील कचरा विलगीकरण करून संकलित झाला तर स्वच्छतेची समस्याच राहणार नाही. याचा विचार करता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घराघरातील कचरा विलगीकरण करून संकलित झाला तर स्वच्छतेची समस्याच राहणार नाही. याचा विचार करता कचरा संकलनाचा नवा पॅटर्न राबविला जात आहे. १०० किलोहून अधिक कचरा निघणाऱ्या हॉटेल चालकांना ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवावयाचा आहे. तसेच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची आहे. परंतु वारंवार सूचना दिल्यानंतरही ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया न करणाऱ्या शहरातील मोठ्या १२ हॉटेलांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोटीस बजावली आहे.
यात हॉटेल प्राईड, हॉटेल तुली इम्पेरियल, हॉटेल मॅजेस्टीक मनोर, हॉटेल सेंटर पॉईंट, हॉटेल अशोक (लक्ष्मीनगर), हॉटेल अशोका माऊं ट रोड, हॉटेल रेडिसन ब्ल्यू, सी.पी.क्लब, गोंडवाना क्लब, वर्धा रोडवरील हॉटेल आदे , हॉटेल तुली इंटरनॅशनल व हॉटेल ट्रॅव्होटेल आदींचा समावेश असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे यांनी मंगळवारी दिली.
शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामावरील मजुरांनी उघड्यावर शौचाला जाऊ नये यासाठी मोठ्या बांधकाम व्यावसायिकांनी मजुरांसाठी शौचालयाची व्यवस्था करावयाची आहे. अन्यथा कारवाई केली जाणार आहे. तसेच बांधकाम करताना रस्त्यावर रेती, विटा व अन्य सामुग्री ठेवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत होणाऱ्या सर्वेक्षणासोबतच आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.
शासनाने याबाबतचा घनकचरा व्यवस्थापनाबाबतचा नवीन कायदा केला आहे. त्यानुसार नागरिकांना व व्यावसायिकांना ओला आणि सुका कचऱ्याची वर्गवारी करावी लागणार आहे. यासाठी दोन डस्टबिन ठेवावयाचे आहेत. १०० किलोहून अधिक कचरा संकलित होणाऱ्या हॉटेल व संस्थांना ओल्या कचऱ्याची स्वत: विल्हेवाट लावावयाची आहे.
कंटेनरची संख्या वाढविणार
शहरातील कचरा संकलनाची व्यवस्था अधिक बळकट करण्यात येईल. वर्षभरात नागरिकांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. शहरात १७ संकलन पॉईंट आहेत. येथील अवस्था बिकट आहे. यामुळे कंटेनरची संख्या वाढविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. त्यानुसार दोन -तीन दिवसात कंटेनरची संख्या वाढविण्यात येणार आहे. बाजारभागात अधिक कचरा निघतो. अशा ठिकाणी कॉम्पेक्टर लावण्यात येतील. कचरा संकलनाची नवीन यंत्रणा उभारली जात आहे.