मिहान-सेझमध्ये बांधकाम न करणाऱ्या १४ कंपन्यांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:18 AM2017-11-23T00:18:34+5:302017-11-23T00:29:25+5:30
उद्योगाला गती देण्याच्या उद्देशाने मिहान-सेझमध्ये जागा विकत घेऊन अद्याप बांधकाम सुरू न केलेल्या कंपन्यांना महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आतापर्यंत १४ कंपन्यांना नोटिसा दिल्याची माहिती आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : उद्योगाला गती देण्याच्या उद्देशाने मिहान-सेझमध्ये जागा विकत घेऊन अद्याप बांधकाम सुरू न केलेल्या कंपन्यांना महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आतापर्यंत १४ कंपन्यांना नोटिसा दिल्याची माहिती आहे. बांधकाम केव्हा सुरू करणार आणि कालबद्ध नियोजन कंपन्यांना देण्यास सांगण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नोटिसाच्या माध्यमातून कंपन्यांना आठवण करून देण्यात येत आहे. प्रतिनिधींसोबत संवाद साधून उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम आहे.
एमएडीसीकडून बड्या कंपन्यांना अभय
मिहान-सेझमध्ये अर्धवट काम करून पुढे काहीही विकास न केलेल्या १३ कंपन्यांनी प्रकल्पातील ३२६ एकर जागा अडवून ठेवली आहे. विशेष म्हणजे, जागा घेऊन आणि करार करूनही काम सुरू न केलेल्या २३ कंपन्यांपैकी एकाही कंपनीला एमएडीसीने नोटीस पाठवलेली नाही. एकीकडे मोठ्या कंपन्यांना सोडून लहान कंपन्यांनाच एमएडीसीने नोटिसा बजावल्या आहेत. ३२६ एकर जागा अडविणाऱ्या १३ कंपन्यांवर एमएडीसी मेहरबान असल्याचा संदेश उद्योजकांमध्ये जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिहान-सेझमध्ये ६६ हून अधिक कंपन्यांनी जागा घेऊन त्यातील केवळ १२ कंपन्यांचे काम सुरू आहे. जमिनीचा ताबा, मंजूर आराखडा आणि अर्धवट बांधकामाच्या आधारावर एमएडीसीने कंपन्यांना विविध पातळीवर विभागले आहे. या श्रेणीत १३ मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्या संपूर्ण जागेचा उपयोग केव्हा करणार, हा गंभीर प्रश्न आहे. यापूर्वीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिहान-सेझमध्ये जागा विकत घेतलेल्या कंपन्यांनी उद्योग सुरू करावेत म्हणून बैठका घेतल्या आहेत. याशिवाय कडक कारवाई करून कंपन्यांना नोटिसा दिल्या होत्या. जागतिक मंदीमुळे सध्या उद्योग सुरू करणे शक्य नसल्याचे उत्तर बहुतांश कंपन्यांनी दिले होते. पुन्हा नोटिसा दिल्यानंतर कंपन्या काय उत्तर देतात, याकडे लक्ष आहे.
नोटीस नव्हे कंपन्यांना स्मरणपत्र
मिहान-सेझमध्ये जागा घेऊन काम सुरू न केलेल्या कंपन्यांना प्लॅन द्या आणि बांधकाम केव्हा सुरू करणार याचा कालबद्ध कार्यक्रम आणि तंतोतंत माहितीची विचारणा करणाऱ्या नोटिसा देऊन १५ दिवसात उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. ही एक नोटीस प्रक्रिया नसून कंपन्यांसाठी स्मरणपत्र आहे. मिहानमध्ये औद्योगिक विकास साधण्याचा उद्देश आहे. कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधणार आहे.
सुरेश काकाणी
उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी.