नागपुरातील १९ सोनोग्राफी सेंटरला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 09:25 PM2021-04-09T21:25:18+5:302021-04-09T21:28:05+5:30
Notice to Sonography Centers गर्भावस्थेत लिंग परीक्षण करण्याच्या आरोपात जिल्ह्यातील १९ सोनोग्राफी सेंटरला नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. लिंग परीक्षण करण्यापासून रोखणे व मुलींचा जन्मदर वाढीचा प्रयत्न करणे, या उद्देशाने गर्भपात रोखण्यासाठी गठित जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गर्भावस्थेत लिंग परीक्षण करण्याच्या आरोपात जिल्ह्यातील १९ सोनोग्राफी सेंटरला नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. लिंग परीक्षण करण्यापासून रोखणे व मुलींचा जन्मदर वाढीचा प्रयत्न करणे, या उद्देशाने गर्भपात रोखण्यासाठी गठित जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत समितीसमोर आठ नवीन सोनोग्राफी केंद्राचे प्रस्ताव सादर झाले. यापैकी केवळ एकाच केंद्राला मंजुरी प्रदान करण्यात आली. वाडी येथील एका केंद्राच्या नवीनीकरणाच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. बैठकीत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वैशाली खेडीकर, प्रसूतीरोग तज्ज्ञ डॉ. सुलभा मूल, डॉ. दिलीप मडावी, अशासकीय सदस्य देवेंद्र क्षीरसागर, प्रवीण धुपे, प्रभाकर तडस, वैशाली वाघमारे उपस्थित होते.
समितीच्या कार्यप्रणालीनुसार ग्रामीण परिसरातील सोनोग्राफी केंद्र जिल्हा शल्यचिकित्सकाच्या अधिकार क्षेत्रात येतात. ग्रामीण परिसरात १०६ सोनोग्राफी केंद्र आहेत. बैठकीत अशीही माहिती देण्यात आली की, पीसीपीएनडीटी ॲक्टअंतर्गत लिंग परीक्षणाबाबत वर्षभरात तीन मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. समितीच्या एकूण आठ बैठकी झाल्या. या कालावधीत एक सोनोग्राफी केंद्र सील करण्यात आले. विधी सल्लागार डॉ. वैशाली वाघमारे यांनी सांगितले की, पीसीपीएनडीटी ॲक्टअंतर्गत सहा प्रकरणे न्यायालयापर्यंत पोहोचली. चार प्रकरणात निर्णय झाला. दोन प्रलंबित आहेत.