रेस्टॉरंटमध्ये सांभाळून ठेवा पाय; नागपूर अग्निशमन विभागाची २०३ जणांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 11:34 AM2018-04-02T11:34:09+5:302018-04-02T11:34:17+5:30

गेल्या दीड महिन्यात मनपाच्या अग्निशमन विभागाने शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट बार आदींची फायर स्टेशननुसार यादी तयार करून संवेदनशील बार व रेस्टॉरेंटला नोटीस जारी केली आहे.

Notice to 203 restaurant of Nagpur Fire Department | रेस्टॉरंटमध्ये सांभाळून ठेवा पाय; नागपूर अग्निशमन विभागाची २०३ जणांना नोटीस

रेस्टॉरंटमध्ये सांभाळून ठेवा पाय; नागपूर अग्निशमन विभागाची २०३ जणांना नोटीस

Next
ठळक मुद्दे२२ इमारती असुरक्षित घोषित१४ इमारतीतील वीज-पाणी कापण्याचे आदेश

राजीव सिंह।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील बार आणि रेस्टॉरेंटमध्ये अनेक वर्षांपासून आगीपासून बचावाच्या सुरक्षेकडे लक्षच देण्यात आलेले नाही. अग्निशमन विभागाकडून कुठल्याही प्रकारची एनओसी घेतली जात नव्हती. परंतु मुंबईत एका रेस्टॉरंंटमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेने राज्य सरकारसह मनपा प्रशासन व अग्निशमन विभागाचे डोळे उघडले. गेल्या दीड महिन्यात मनपाच्या अग्निशमन विभागाने शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट बार आदींची फायर स्टेशननुसार यादी तयार करून संवेदनशील बार व रेस्टॉरेंटला नोटीस जारी केली. सोबतच आगीपासून बचावाच्या सुरक्षेचे उपाय करण्यात आलेले आहेत, अशाच बार-रेस्टॉरंटमध्ये नागरिकांनी जावे, असा सल्लाही दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन विभागातर्फे शहरातील एकूण २०३ हॉटेल, बार, रेस्टॉरंटची पाहणी करून कलम ६ अंतर्गत आगीपासून बचावाच्या उपाययोजना करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. यात कलम ८(१) अंतर्गत २२ बार व रेस्टॉरंटच्या इमारतींना धोकादायक असल्याचे जाहीर करीत तेथून हटण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. याशिवाय १४ प्रतिष्ठानांमधील वीज-पाणीचे कनेक्शन कापण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. सर्व उपाययोजना करण्यासाठी महिनाभराची वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर कारवाई करण्यात येईल. बार- हॉटेल-रेस्टॉरंटला २०१५ मध्ये अग्निशमन विभागाची एनओसी घेण्याची अट रद्द करण्यात आली होती.
केवळ १५ मीटर उंची असलेल्या इमारतींनाच नगररचना नियमानुसार आगीपासून सुरक्षा करण्याच्या उपायांसाठी अग्निशमन विभागाची एनओसी आवश्यक होती. काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या एका बार-रेस्टॉरंटमध्ये आग लागून १४ लोक जिवंत जळाले. त्यानंतर प्रत्येक बार-रेस्टॉरंटला आगीपासून सुरक्षेचे उपाय करण्याचे आदेश जारी करण्यात आले. नागपुरातही रेस्टॉरंट व बारमध्ये अग्निशमन नियम आवश्यक करण्यात आले.

१००० पेक्षा अधिक बार-रेस्टॉरंट
२०१५ पूर्वीपर्यंत अग्निशमन विभागाकडे ७५० च्या जवळपास खाद्यगृह (इटिंग हाऊस) एनओसी घेत होते. परंतु सरकारने संबंधितांसाठी एनओसीची अट रद्द केली. त्यानंतर अग्निशमन विभागाकडे कुणीच फिरकले नाही. सध्या शहरात एक हजार पेक्षा अधिक बार, रेस्टॉरेंट असल्याची शक्यता आहे.

रुफटॉप रेस्टॉरंट धोकादायक
लहान-मोठ्या रुफटॉप रेस्टॉरंटची संख्या शहरात एक वरून दीड डझनच्या जवळपास आहे. परंतु संबंधित रेस्टॉरंट संचालकांनी आगीपासून वाचण्याच्या उपाययोजना केलेल्या नाहीत. अभ्यंकरनगरात काही दिवसांपूर्वी रुफटॉप रेस्टॉरंट तोडण्याची कारवाई करण्यात आली होती. आग लागल्यास रुफटॉप रेस्टॉरंटमधून बाहेर निघणे अतिशय कठीण होते.

नियमित कारवाई सुरू -उचके
मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले की, बार आणि रेस्टॉरंटमध्ये आगीपासून सुरक्षेचे उपाय करणे आवश्यक आहे. फायर स्टेशनमार्फत तपासणी अभियान सुरु आहे. जिथेही अनियमितता दिसून येते, त्यांना नोटीस जारी केले जात आहे. आतापर्यंत २०० पेक्षा अधिक नोटीस जारी करण्यात आले आहे. सात दिवस ते एक महिन्याची वेळ आगीच्या उपाययोजना करण्यासाठी देण्यात आलेली आहे. संंबधित संचालकांनी योग्य पाऊल उचलले नाही, तर इमारत असुरक्षित घोषित करून वीज-पाणी कापण्याचे आदेश जारी केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Notice to 203 restaurant of Nagpur Fire Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग