दिवाळीच्या सुटीनंतरही गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 08:12 PM2019-10-31T20:12:25+5:302019-10-31T20:14:50+5:30
दिवाळीच्या सुटीनंतरही अनुपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे कर्मचारी हादरले असून अनेक जण काय उत्तर द्यावे, यासाठी विविध कारणांचा शोध घेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीच्या सुटीनंतरही अनुपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे कर्मचारी हादरले असून अनेक जण काय उत्तर द्यावे, यासाठी विविध कारणांचा शोध घेत आहेत.
शासकीय कर्मचाऱ्यांना शनिवारपासून सुटी होती. ही सुटी तब्बल चार दिवस म्हणजे मंगळवारपर्यंत होती. त्यामुळे शासकीय कार्यालय सलग चार दिवस बंद होते. बुधवारी कार्यालय सुरू झाले. मात्र या दिवशी अनेक कार्यालये ओस पडून होती. कर्मचारी कामावर आले नाही. जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयातही हाच प्रकार दिसून आला. निवडणुकीमुळे अनेक कामे प्रलंबित होती. त्यात आलेल्या चार दिवसांच्या सुटीमुळे कामाच्या फाईल्सचा ढीग वाढला. अनेक दिवसानंतर नियमित काम होणार असल्याने नागरिकही आशेत होते. त्यांचीही गर्दी वाढली होती. मात्र कार्यालयात कर्मचारी नसल्याने नागरिकांना आल्यापावली परत जावे लागले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक जण विना परवानगी सुटीवर होते. यामुळे कामावर परिणाम झाला. बुधवारी सुटीवर असलेल्यांना जिल्हा प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, २० च्यावर कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. काहींनी उत्तरही सादर केले. यातील बहुतांश कर्मचाऱ्यांनी आजारी असल्याचा बहाणा सांगितल्याची माहिती आहे.