पाटनकर, सहारिया यांना अवमानना नोटीस
By admin | Published: March 9, 2017 07:50 PM2017-03-09T19:50:40+5:302017-03-09T19:50:40+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा पाटनकर-म्हैसकर व राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 9 - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी एका प्रकरणात नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा पाटनकर-म्हैसकर व राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांना अवमानना नोटीस बजावली.
२०१५ मध्ये ब्रजभूषणसिंग बैस व वासुदेव चुटे यांनी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव खुर्द ग्राम पंचायत क्षेत्राचा सालेकसा नगर परिषद क्षेत्रात समावेश करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी सरकारी वकिलाने आमगाव खुर्दचा सालेकसा नगर परिषदेत समावेश करण्याचा निर्णय झाल्याची माहिती न्यायालयाला दिली होती. त्यावरून न्यायालयाने सदर निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा आदेश शासनास देऊन याचिका निकाली काढली होती. तेव्हापासून शासनाने निर्णयावर अंमलबजावणी केली नाही. गेल्या २० फेब्रुवारी रोजी नगर परिषद निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यात आमगाव खुर्दचा समावेश नाही. परिणामी बैस व चुटे यांनी उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांनी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर वरील अधिकाऱ्यांना नोटीस बजावून ३ आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. तसेच, ही याचिका प्रलंबित असेपर्यंत निवडूक स्थगित ठेवण्याचा अंतरिम आदेश दिला. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. श्रीरंग भांडारकर व अॅड. रवींद्र पांडे यांनी कामकाज पाहिले.