लाखो शेतकऱ्यांना वीज कापण्याची नोटीस ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:10 AM2021-02-21T04:10:38+5:302021-02-21T04:10:38+5:30
कमल शर्मा नागपूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीज बिल थकबाकीदारांसह आता महावितरणने शेतकऱ्यांकडेही आपला मोर्चा वळविला आहे. थकबाकीदार ...
कमल शर्मा
नागपूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीज बिल थकबाकीदारांसह आता महावितरणने शेतकऱ्यांकडेही आपला मोर्चा वळविला आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना यासंदर्भात नोटीसही पाठविण्यात येत आहेत. या नोटीसमध्ये १५ दिवसाच्या आत चालू बिल भरण्याचे आवाहन करीत बिल न भरल्यास त्यांची वीज कापण्यात येईल, असा स्पष्ट इशाराच देण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यातील ४४ हजार शेतकऱ्यांसह विदर्भातील लाखो शेतकऱ्यांना ही नोटीस मिळालेली आहे.
राज्यभरात कृषिपंपांची थकबाकी ४४,७६७ कोटीवर पोहोचली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी कृषिपंप वीज कनेक्शन धोरण जाहीर करण्यात आले आहे. याअंतर्गत थकीत रकमेपैकी काही रक्कम भरल्यास ६६ टक्के वीज बिल माफ होईल. नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर कृषिपंपधारकांवर ६२५ कोटी रुपये थकीत आहे. पहिल्या वर्षी जर शेतकऱ्यांनी २२९ कोटी रुपये भरले तर उर्वरित ३९६ कोटी रुपये माफ होतील. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून ठिकठिकाणी कार्यक्रम होताहेत. याचदरम्यान महावितरणने चालू बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे कनेक्शन कापण्याचा निर्णय घेतला. नागपूर जिल्ह्यात ८३ हजार कृषिपंप कनेक्शनवर थकबाकी आहे. बहुतांश कृषिपंपधारकांवर चालू महिन्याचेच बिल थकीत आहे. आता याच शेतकऱ्यांना लाईनमन नोटीस देत आहेत. पूर्ण विदर्भात जवळपास नऊ लाख शेतकऱ्यांकडे बिल थकीत आहे. गुरुवारपासून या शेतकऱ्यांना नोटीस पाठविले जात आहेत. लाखो शेतकऱ्यांपर्यंत नोटिसा पोहोचल्या आहेत.
या नोटीसमध्ये त्यांना सप्टेंबरपर्यंतचे चालू बिल भरण्यास सांगण्यात आले आहे. यात कृषिपंप वीज कनेक्शन धोरणाचा लाभ घेण्याचे आवाहनही केले आहे. शेतकऱ्यांना पाठिवण्यात आलेली ही सध्या दुसरी नोटीस आहे. पहिल्या नोटीसमध्ये थकबाकीचा उल्लेख करीत बिल भरण्याचे आवाहन केले होते. दुसऱ्या नोटीसमध्ये वीज कापण्याचा इशारा देण्यात आला आहे. या माध्यमातून महावितरण शेतकऱ्यांना कृषिधोरणाचा लाभ घेण्यास भाग पाडता असल्याचा आरोप केला जात आहे. दुसरीकडे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कंपनीची आर्थिक परिस्थिती पाहता थकबाकी वसूल करण्याशिवाय पर्याय नाही.
बॉक्स
पुढील पाच दिवसात सर्वच थकबाकीदारांना नोटीस
महावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी सांगितले की, गुरुवारपासून नोटीस पाठविण्यास सुरुवात झाली. विदर्भातील किती शेतकऱ्यांपर्यंत नोटीस पोहोचली याची निश्चित संख्या नाही. परंतु विदर्भात जवळपास नऊ लाख शेतकऱ्यांकडे चालू महिन्याचे बिल थकीत आहे. येत्या पाच दिवसात सर्वांपर्यंत नोटीस पोहोचून जाईल. सोमवारी ते विदर्भातील सर्व मुख्य अभियंत्यांसोबत बैठक घेऊन या मोहिमेचा आढावा घेतील.
बॉक्स
मोबाईल नंबरही घेताहेत लाईनमन
शेतकऱ्यांना नोटीस देताना त्यांचे मोबाईल नंबरही लाईनमन नोंदवून घेताहेत. महावितरणचे म्हणणे आहे की, पुढच्या वेळी नोटीस मोबाईलवरच पाठवण्यात येईल. ज्या दिवशी नोटीस मिळेल त्या दिवसापासून १५ दिवसात चालू महिन्याचे थकीत बिल भरणे आवश्यक राहील.