नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्ण मालती पाठक हत्या प्रकरणी चौघांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:01 AM2017-12-21T00:01:07+5:302017-12-21T00:01:48+5:30
प्रादेशिक मनोरुग्णालयात दोन रुग्णांचा गळा आवळून हत्या झाल्याच्या प्रकरणातील दोषी कोण, हा प्रश्न १५ महिने उलटूनही अनुत्तरित आहे. परंतु, यातील एका प्रकरणात आरोग्य उपसंचालक कार्यालयाने आता मनोरुग्णालयातील चार कर्मचाऱ्यांना हत्येप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात दोन रुग्णांचा गळा आवळून हत्या झाल्याच्या प्रकरणातील दोषी कोण, हा प्रश्न १५ महिने उलटूनही अनुत्तरित आहे. परंतु, यातील एका प्रकरणात आरोग्य उपसंचालक कार्यालयाने आता मनोरुग्णालयातील चार कर्मचाऱ्यांना हत्येप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या ‘स्किझोफ्रेनिया’ची रुग्ण मालती पाठक (६०) यांचा मृत्यू ६ आॅक्टोबर २०१६ रोजी त्यांचाच वॉर्डातच झाला. पाठक यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता तर त्यांची गळा दाबून हत्या झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १२ फेब्रुवारीच्या अंकात ‘पुन्हा एका मनोरुग्णाची गळा आवळून हत्या’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले. यापूर्वी, १७ सप्टेंबर २०१६ रोजी जयंत नेरकर (४४) या मनोरुग्णाचीही गळा आवळून हत्या झाल्याचे वृत्त सर्वात आधी ‘लोकमत’ने प्रसिद्ध करून मनोरुग्णालयाचा गैरकारभारच चव्हाट्यावर आणला होता. या दोन्ही प्रकरणाला घेऊन आरोग्य मंत्र्यांना गेल्या हिवाळी व उन्हाळी अधिवेशनात विविध प्रश्नांना सामोरे जावे लागले होते. मालती पाठक हत्या प्रकरणात तर आरोग्य विभागाकडून साधी चौकशी झाली नव्हती. त्यामुळे हे प्रकरण अंगावर शेकणार म्हणून आरोग्य उपसंचालक कार्यालयाने सहायक संचालक (हिवताप) डॉ. मिलिंद गणवीर यांच्या अध्यक्षतेखाली दोन महिन्यांपूर्वी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली. त्यात माताकचेरीच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी व तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांचा समावेश होता. डॉ. गणवीर समितीने चौकशीनंतरच्या अहवालात मनोरुग्ण पाठक यांच्या हत्याप्रकरणात चार जणांवर ठपका ठेवला होता. त्यानंतर हा अहवाल आरोग्य उपसंचालकांकडे सादर केला. आरोग्य उपसंचालकांनी हा अहवाल सहसंचालक (मनोरुग्णालय) डॉ. साधना तायडे यांच्याकडे पाठविला. त्यानंतर मात्र हा अहवाल डॉ. तायडे यांच्याकडे धूळखात पडून राहिला. नागपुरातील हिवाळी अधिवेशनात याप्रकरणी प्रश्न उपस्थित झाल्यास काहीतरी कारवाई केल्याचे दाखविण्यासाठी १५ डिसेंबर रोजी आरोग्य उपसंचालक कार्यालयाने मनोरुग्णालयातील तीन परिचारिका व एक परिचर अशा चार जणांना पाठक यांच्या हत्येप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली. तब्बल १५ महिन्यानंतर कारणे दाखवा नोटीस मिळाल्याने कर्मचारीही आश्चर्यचकित झाले आहेत.