तीन डॉक्टरांसह नऊ ‘लेट लतिफां’ंना नोटीस
By admin | Published: May 14, 2016 02:54 AM2016-05-14T02:54:50+5:302016-05-14T02:54:50+5:30
रुग्णसेवेत वेळेला खूप महत्त्व आहे. परंतु काही डॉक्टरांसह तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांना याचे काही देणे-घेणे नसल्याचा प्रकार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी दिसून आला.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : नोंदणी कक्षापासून ते रक्तपेढीत कर्मचारी गैरहजर
नागपूर : रुग्णसेवेत वेळेला खूप महत्त्व आहे. परंतु काही डॉक्टरांसह तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांना याचे काही देणे-घेणे नसल्याचा प्रकार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी दिसून आला. ‘लेट लतिफ’ असलेल्या तीन वरिष्ठ डॉक्टरांसह तीन तंत्रज्ञ, एक फार्मसिस्ट व दोन चतुर्थ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या हॉस्पिटलच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडल्याचे बोलले जात आहे.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागाची (ओपीडी) वेळ सकाळी ८.३० ते दुपारी १ अशी आहे. रुग्ण सकाळी ७.३० वाजतापासून गर्दी करतात. परंतु नोंदणी कक्षापासून ते रक्तपेढी, प्रयोगशाळा, विविध विभाग या वेळेत सुरू होत नसल्याच्या तक्रारी आहेत. याची दखल हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी शुक्रवारी घेतली. सकाळी ९ वाजता त्यांनी हॉस्पिटलचा राऊंड घेतला. नोंदणी कक्षासमोर २० रुग्ण रांगेत उभे होते. परंतु येथील कर्मचारी गायब होता. मधुमेहाची चाचणी पाणीही न पिता करावी लागते. यामुळे रुग्ण सकाळपासून येतात. परंतु ९ वाजून २० मिनिटे होऊनही रक्त संकलन केंद्रात विभाग प्रमुखांसह तंत्रज्ञचा पत्ता नव्हता. ९.३० वाजले असतानाही रक्तपेढीला कुलूप ठोकले होते. आठवड्यातून केवळ दोन दिवस नेफ्रालॉजी विभागाची ओपीडी असते. शुक्रवारी या विभागासमोर डायलिसीस व इतर रुग्णांची रांग लागली होती. परंतु या विभागाच्या विभाग प्रमुख आल्या ९.४० वाजता. औषधे वितरित करणारी खिडकीही बंद होती. यातच दोन चतुर्थ कर्मचारीही कामावर हजर नव्हते. याची गंभीर दखल डॉ. श्रीगिरीवार यांनी घेतली. (प्रतिनिधी)
यांना बजावली कारणे दाखवा नोटीस
शुक्रवारी उशिरा पोहचलेल्या रक्तपेढीच्या प्रमुख डॉ. अनिता देशमुख, बायोकेमेस्ट्री विभागाचे प्रमुख डॉ. संजय सोनुने, नेफ्रालॉजी विभागाचे प्रमुख डॉ. चारुलता बावनकुळे, तंत्रज्ञ कांचन उपासने, स्वाती अग्रवाल, अंजली अरोरा, फार्मसिस्ट लालवानी, चतुर्थ कर्मचारी येठे व खरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.