खुलासा करा, कुटुंब शस्त्रक्रिया अर्ध्यावर सोडून गेलेल्या डॉक्टरला नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 11:04 AM2023-11-11T11:04:46+5:302023-11-11T11:05:46+5:30
लोकमत इम्पॅक्ट : जिल्हा शल्यचिकित्सकांनी बजावली नोटीस
नागपूर : जिल्हा परिषदेच्या खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चहा न मिळाल्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अर्ध्यावर सोडून जाणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजराम भलावी यांनी कर्तव्य व जबाबदाऱ्यांमध्ये कसूर केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. बी. राठोड यांनी भलावी यांना नोटीस बजावून उलटटपाली खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
भूल दिलेल्या महिलांवर शस्त्रक्रिया न करता डॉक्टर निघून गेल्याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. याची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. बी. राठोड यांनी भलावी यांना नोटीस बजावून खुलासा मागितला आहे.
३ नोव्हेंबरला भलावी हे प्राथमिक आरोग्य केंद्र खात येथे स्त्री शस्त्रक्रिया शिबिरांतर्गत शस्त्रक्रिया करण्यासाठी गेले व तेथे त्यांनी ९ पैकी ५ शस्त्रक्रिया करून ४ शस्त्रक्रिया न करता अर्ध्यावर टाकून निघून गेले. त्यांनी सदर शस्त्रक्रिया शिबिरामध्ये उपस्थित राहून शस्त्रक्रिया करण्याकरिता वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक होते; मात्र वैद्यकीय अधीक्षक, पारशिवनी अथवा जिल्हा शल्यचिकित्सक, सर्वोपचार रुग्णालय नागपूर किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर यांच्यापैकी कुणाची परवानगी त्यांनी घेतली नाही.
वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेता ग्रामीण रुग्णालय, पारशिवनी हे मुख्यालय सोडणे, परस्पर स्त्री शस्त्रक्रिया शिबिरास उपस्थित राहणे तसेच शिबिराच्या ठिकाणावरून वाद घालून शस्त्रक्रिया अर्ध्यावर टाकून निघून जाणे, हे कार्यालयीन शिस्तीच्या विरुद्ध आहे. त्यांनी आपल्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांमध्ये कसूर केल्याचे निदर्शनास येत असल्याचे राठोड यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे. शिबिरस्थळावरुन शस्त्रक्रिया अर्ध्यावर टाकून गेल्यामुळे माध्यमांमध्ये छापून आलेल्या बातमीमुळे शासकीय रुग्णालयांची प्रतिमा मलीन झाली आहे. यामुळे तुमच्यावर "महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ नुसार कार्यवाही का करू नये, याबाबत त्यांनी उलटटपाली खुलासा सादर करावा,असे राठोड यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत जि.प.च्या उपाध्यक्ष व आरोग्य सभापती कुंदा राऊत यांनी या प्रकरणाची त्रिसदस्यीय समिती मार्फत चौकशी करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले होते. याबाबतच्या अहवालातही डॉ. भलावी यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.