कुख्यात भद्रेला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:08 AM2021-04-15T04:08:42+5:302021-04-15T04:08:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - गँगस्टर राजू भद्रे याला गुन्हे शाखेच्या पथकाने आज मुसक्या बांधून त्याची नाशिकच्या कारागृहात रवानगी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - गँगस्टर राजू भद्रे याला गुन्हे शाखेच्या पथकाने आज मुसक्या बांधून त्याची नाशिकच्या कारागृहात रवानगी केली. लवकरच भद्रेला विशाल पैसाडेली हत्या प्रकरणात पोलीस ताब्यात घेणार आहेत. पिंटू शिर्के हत्याकांडात आजन्म कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर कुख्यात भद्रे आणि त्याच्या टोळीतील गुंडांना कारागृहात डांबले. भद्रेला नंतर नाशिकच्या कारागृहात हलविण्यात आले होते. तेथून पॅरोल मिळवून भद्रे बाहेर आला. त्यानंतर त्याने येथे मोठमोठे कारनामे सुरू केले. भद्रेच्या पत्नीच्या नावाने बनावट कागदपत्राच्या आधारे एका कोट्यवधीच्या जमिनीवर कब्जा करण्यात आला. यात भद्रेने पाठबळ दिल्याने दोन गुन्हेगार एकमेकांच्या विरोधात ठाकले. त्यांनी काही दलालांची मदत घेऊन पोलीस अधिकाऱ्यांचीही दिशाभूल करून ही जमीन हडपण्याचे प्रयत्न केले. भद्रेने अशाच प्रकारे अनेक कारनामे केले. ते आता उघड झाल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेेशकुमार तसेच गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांची थेट नजर भद्रे आणि साथीदारांकडे वळली. अशात कुख्यात रणजित सफेलकरने भद्रेच्या मदतीने विशाल पैसाडेलीची हत्या करून त्याचा मृत्यू अपघातात झाल्याचा बनाव केला. मात्र, गुन्हे शाखेच्या तपासात या हत्याकांडाचा पर्दाफाश झाला. त्यामुळे पोलीस भद्रेकडे नजर ठेवून होते. त्याचा उपद्रव वाढू शकतो, हे ध्यानात घेत आज गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन नाशिकच्या कारागृहात डांबण्यासाठी त्याला तिकडे नेले. लवकरच त्याला विशाल पैसाडेलीच्या हत्येच्या आरोपात गुन्हे शाखा अटक करणार आहे.
---