अट्टल दुचाकी चोराला केली अटक, १२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
By दयानंद पाईकराव | Published: September 9, 2023 05:08 PM2023-09-09T17:08:28+5:302023-09-09T17:13:02+5:30
२० दुचाकी केल्या जप्त
नागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट एकने अट्टल दुचाकीचोराला अटक करून २० दुचाकींसह १२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राहुल सुखदेव ठाकरे (वय ३७, रा. पाचझोपडा, मिनिमातानगर) मुळ पत्ता बैतुल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३१ ऑगस्टला विजय चंद्रभान अन्ने (वय ४६, रा. रमाबाई आंबेडकरनगर, जयताळा) यांनी आपली दुचाकी कार्यालयासमोर उभी केली होती. ही दुचाकी चोरीला गेल्यामुळे त्यांनी प्रतापनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या समांतर तपासात युनिट एकच्या अधिकारी व अंमलदारांनी मिळालेली माहिती व तांत्रीक तपास केला. त्यांना आरोपी राहुलबद्दल माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
यासोबतच आरोपीने प्रतापनगर ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चार दुचाकी, नंदनवन ठाण्याच्या हद्दीतून चार दुचाकी, यशोधरानगर ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी, लकडगंज, हुडकेश्वर, वाठोडा, कळमेश्वर, नरखेड येथून प्रत्येकी एक अशा २० दुचाकी चोरी केल्याचे सांगितले.त्याच्या ताब्यातून १२.५० लाखांच्या २० दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कामगिरी निरीक्षक सुहास चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र गुप्ता, प्रविण महामुनी, नितीन वासनिक, सुनीत गुजर, नुतनसिंग छाडी आदींनी केली.