कुख्यात बिल्डर मुकेश झाम याला पत्नीसह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:18 AM2019-09-27T00:18:07+5:302019-09-27T00:18:55+5:30
शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा कुख्यात बिल्डर मुकेश झाम आणि त्याची पत्नी पुनम झाम या दोघांच्या नागपूर पोलिसांनी पुण्यात जाऊन मुसक्या बांधल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा कुख्यात बिल्डर मुकेश झाम आणि त्याची पत्नी पुनम झाम या दोघांच्या नागपूर पोलिसांनी पुण्यात जाऊन मुसक्या बांधल्या. त्यांना घेऊन पोलीस पथक नागपूरकडे निघाले असून, शुक्रवारी दुपारपर्यंत ते नागपुरात पोहचणार आहे.
आरोपी मुकेश झाम आणि त्याच्या पत्नीवर फसवणुकीचे दोन गुन्हे आहेत. त्यातील एक नवोदय बँकेच्या घोटाळ्याचा तर दुसरा गृह प्रकल्पाच्या नावाखाली शेकडो जणांचे कोट्यवधी रुपये हडपण्याचा आहे. आरोपी हेमंत झामचा मुकेश झाम काका होय. हेमंत, मुकेश आणि त्याचे काही नातेवाईक आणि साथीदार यांनी कन्हैय्या सिटीच्या नावाखाली बंगलो, फ्लॅट स्वस्त दरात देण्याची थाप मारून शेकडो लोकांना गंडविले. अनेकांची आयुष्यभराची रक्कम गिळंकृत करून त्यांना पैशासाठी मोताद करणाऱ्या आरोपींनी नागपुरातून पळ काढल्यानंतर पीडितांच्या पैशावर ऐशोरामात जगणे सुरू केले. पोलीस त्यांचा जागोजागी शोध घेत होते. मात्र, ते पोलिसांनाच काय, न्यायालयाच्या वॉरंटलाही दाद देत नव्हते. पोलिसांच्या लेखी फरार असलेला हेमंत झाम दोन कोटींच्या आलिशान सदनिकेत सोनेगावात ऐशोरामात राहत होता. अनेकांची आर्थिक कोंडी करून त्यांना रस्त्यावर आणणारे आरोपी झाम आणि त्याचे साथीदार पोलिसांना कसे काय सापडत नाही, असा सवाल करून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी त्यांना तातडीने शोधून काढण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर, गुन्हे शाखेच्या युनिट एक मधील पथकाने हेमंत झाम याला दोन आठवड्यांपूर्वी नाट्यमयरीत्या अटक केली होती. त्यानंतर त्याचा साथीदार यौवन गंभीरही पोलिसांच्या हाती लागला. सध्या हे दोघे न्यायालयीन कस्टडीत आहेत. दरम्यान, या दोघांच्या चौकशीतून हेमंत झामचा काका आरोपी मुकेश झाम पुण्यात हिंजेवाडी भागात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, गुन्हेशाखेच्या आर्थिक विभागाच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी आपले पथक पुण्यात पाठविले. तेथे पोलिसांनी बरीच शोधाशोध केल्यानंतर बुधवारी सकाळी मुकेश झाम पोलिसांच्या हाती लागला. तो आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या सदनिकेची तपासणी केली असता कोट्यवधींची रोकडही पोलिसांना मिळाल्याचे समजते. मात्र, रोकड सापडल्याच्या माहितीला दुजोरा मिळू शकला नाही.
आरोपी झाम दाम्पत्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस पथकाने तेथील न्यायालयात कायदेशीर प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर सायंकाळी तेथून पोलीस पथक झाम दाम्पत्याला घेऊन नागपूरकडे निघाले. शुक्रवारी दुपारपर्यंत ते नागपुरात पोहचतील, असे सूत्रांनी सांगितले.
शुक्रवारपासून पोलिसांची शोधाशोध
येथील गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाचे (ईओडब्ल्यू) पथक गेल्या शुक्रवारपासून पुण्यात झामला शोधत होते. अखेर गुरुवारी सकाळी हिंजेवाडी परिसरात तो पोलिसांच्या हाती लागला. झाम याने नागपुरात गिळंकृत केलेली रक्कम पुण्यात कोट्यवधीची मालमत्ता जमविण्यासाठी गुंतविल्याचे समजते.