नागपुरातील कुख्यात बिल्डर झामचा गोलमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 11:46 PM2019-09-16T23:46:55+5:302019-09-16T23:48:00+5:30

नोकरदार, व्यावसायिक आणि काळे धन जमविणाऱ्यांचे शेकडो कोटी रुपये हडपल्यानंतर मालामाल झालेल्या कुख्यात हेमंत सिकंदर झाम याने एवढी प्रचंड रक्कम कुठे जिरवली, असा प्रश्न आहे.

The notorious builder of Nagpur Jham is in turmoil | नागपुरातील कुख्यात बिल्डर झामचा गोलमाल

नागपुरातील कुख्यात बिल्डर झामचा गोलमाल

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक कंगाल, विशिष्ट मालामाल : कोट्यवधींची रक्कम जिरवली कुठे, पोलिसांची शोधाशोध

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नोकरदार, व्यावसायिक आणि काळे धन जमविणाऱ्यांचे शेकडो कोटी रुपये हडपल्यानंतर मालामाल झालेल्या कुख्यात हेमंत सिकंदर झाम याने एवढी प्रचंड रक्कम कुठे जिरवली, असा प्रश्न आहे. पोलिसांनी कसून तपास केल्यास प्रचंड घबाड आणि कुख्यात झामच्या साखळीत जुळलेले आणखी काही बडे मासे गळाला लागू शकतात.
कुख्यात झामविरुद्ध ग्राहक मंचात ४०० आणि पोलिसांत २५० ते ३०० गुंतवणूकदारांनी तक्रारी नोंदविल्या. अर्थात तक्रारदारांचा हा ७०० चा अधिकृत आकडा आहे. त्यातील कुणाचे पाच लाख तर कुणाचे ५० लाख रुपये झामने हडपले आहे. या एकूण पीडितांची रक्कम गोळा केली तर जेवढे कोटी रुपये होतील, त्यापेक्षा दहापट जास्त रक्कम काळ्या कमाईवाल्यांची झामने हडपल्याची ओरड होती. शिवाय एकट्या नवोदय बँकेतून कर्जाच्या रूपाने झामने ५ कोटी ८५ लाख रुपये उचलले आहे. नवोदयचे अध्यक्ष अशोक धवड आणि सीईओ संजय नाईक यांनी नियमांचे उल्लंघन करून झामला कर्जाच्या नावाखाली आंदण दिल्यासारखी एवढी मोठी रक्कम दिली आहे. ही रक्कम देण्यापूर्वी धवड आणि नाईकने झामसोबत ‘थ्री स्टार मीटिंग’ केली होती. झामला लाभ पोहचविण्यासाठी धवड आणि नाईकने आपल्याच बँकेच्या संचालक मंडळातील सहकाऱ्यांनाही अंधारात ठेवले होते. गणपूर्ती नसताना त्यांनी बैठक घेतली होती. विशेष म्हणजे, ५ हजाराचे कर्ज देताना अनेक स्टॅम्प पेपर (मुद्रांक) मागणाऱ्या नवोदय बँकेच्या या मंडळींनी कुख्यात झामला कर्जाच्या नावाखाली कोट्यवधींची रक्कम बहाल करताना केवळ साध्या पेपरवर करारनामा केला होता. शेकडो खातेधारकाच्या घामाची रक्कम कुख्यात झामच्या हातात कोंबताना आणि नवोदय बँकेला बुडविण्यासाठी झामला हाताशी धरणाऱ्या धवड आणि नाईकचा हेतू काय होता, त्यांनी कोणता लाभ पदरात पाडून घेतला, त्याचीही पोलीस चौकशी करीत आहेत.
अनेकांना उद्ध्वस्त करणाऱ्या थंड डोक्याचा गुन्हेगार हेमंत झाम याने पोलिसांचीही दिशाभूल चालवली आहे. दोन कोटींच्या आलिशान सदनिकेत राहणारा झाम स्वत:जवळ काहीच नसल्याचे सांगतो. आपण एकाकडून रक्कम घेतली अन् दुसऱ्याला (कर्जदाराला) दिली. आपल्याकडे काहीच शिल्लक नाही, आपणच आर्थिक कोंडीत असल्याचे पोलिसांना सांगत असल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, हेमंत झामने अग्रवालच्या डब्यात मोठी रक्कम टाकली असून, येथील डबेवाल्याच्या तो नियमित संपर्कात असल्याचीही चर्चा आहे. हेमंतचा काका मुकेश झाम याचा मेव्हणा (साळा) आणि सध्या हेमंतसोबत पोलिसांच्या कस्टडीत असलेला आरोपी यौवन गंभीरची ई-रिक्षाची कंपनी आहे. अनेक गोरगरिबांच्या रकमेतून त्याने आपली कोट्यवधींची मालमत्ता जमविली आहे. मात्र, आपला या घोटाळ्याशी कसलाही संबंध नसल्याचे तो पोलिसांना सांगत आहे.
साथीदार टप्प्यात!
सूत्रांच्या माहितीनुसार, कुख्यात हेमंत झाम ज्यांच्या नियमित संपर्कात होता, ज्यांनी झामला कोट्यवधींची रक्कम बुकीकडे, डबेवाल्याकडे जिरविण्यासाठी मदत केली, त्या काही साथीदारांची माहिती पुढे आली आहे. पोलिसांच्या ते टप्प्यात असून पुढच्या काही तासांत त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कुख्यात झामने ज्यांची ज्यांची फसवणूक केली, त्या सर्वांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने केले आहे.

 

 

Web Title: The notorious builder of Nagpur Jham is in turmoil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.