नागपुरातील प्रतापनगरात सराईत गुन्हेगाराची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 10:32 PM2018-09-03T22:32:48+5:302018-09-03T22:35:52+5:30
प्रतापनगरातील एका सराईत गुन्हेगाराची त्याच्या सख्ख्या भाच्यासह दोघांनी निर्र्घृण हत्या केली. पप्पू ऊर्फ प्रवीण देवराव वंजारी (वय ३५) असे मृताचे नाव आहे. लोखंडेनगरातील पप्पूच्या घराजवळच सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रतापनगरातील एका सराईत गुन्हेगाराची त्याच्या सख्ख्या भाच्यासह दोघांनी निर्र्घृण हत्या केली. पप्पू ऊर्फ प्रवीण देवराव वंजारी (वय ३५) असे मृताचे नाव आहे. लोखंडेनगरातील पप्पूच्या घराजवळच सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला होता.
शुभम आणि काल्या अशी आरोपींची नावे आहेत. मृत पप्पू हा प्रतापनगरातील सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. पप्पूला पाच बहिणी आहेत. त्याने एका पाठोपाठ दोन बायका केल्या. या दोन असताना पुन्हा त्याने सुनीता नामक विवाहित महिलेच्या घरी जाणे सुरू केले. तो तिथेच पडून राहत असल्यामुळे तिच्या घरात वाद वाढला. इकडे पप्पूच्या दोन्ही बायकांसोबतही त्याचा नेहमी वाद होत होता. बहिणी आणि अन्य नातेवाईकांसोबतही त्याचे फारसे पटत नव्हते. चार दिवसांपूर्वी पप्पूचा भाचा शुभम याच्यासोबत जोरदार वाद झाला होता. भरचौकात पप्पूने शुभमला मारहाण केली. त्यामुळे तो सुडाने पेटला होता. त्याच दिवशी शुभमच्या मावशीची (पप्पूच्या बहिणीची) दुचाकी चोरीला गेली. पप्पू सराईत चोरटा असल्यामुळे ती त्यानेच चोरली असावी, असा शुभमला संशय वाटत होता. त्यामुळे तो पप्पूचा काटा काढण्याच्या तयारीला लागला होता. त्याने शस्त्रांची जमवाजमव केली आणि काही मित्रांनाही मामाचा काटा काढून घेण्याच्या कटात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला. इतरांनी त्याला नकार दिला मात्र योगेश काल्या तयार झाला. त्यामुळे सोमवारी दुपारपासून शुभम आणि योगेश हे दोघे पप्पूचा शोध घेत होते. दुपारी ३.३० च्या सुमारास त्यांना पप्पू त्याच्या घराजवळच्या चौकात दिसला. त्यावेळी आरोपींजवळ शस्त्र नव्हते. पप्पूने शुभमने एकमेकांना पाहताच शिवीगाळ सुरू केली. त्यावेळी त्यांच्यात हाणामारी झाली. पप्पूने यावेळी शुभमला ब्लेड मारून जखमी केले. त्यानंतर तो घराकडे निघाला. तिकडे सुडाने पेटलेल्या शुभम आणि योगेशने चाकू काढून आणला आणि पप्पूकडे जाऊन त्याच्यावर सपासप घाव घातले. यावेळी वस्तीतील ५० पेक्षा जास्त लोक आजूबाजूला होते. सर्वांसमोर आरोपींनी पप्पूला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. दहशतीमुळे कुणीही पप्पूच्या मदतीला धावले नाही.
दरम्यान, या थरारक घटनेची माहिती कळताच प्रतापनगरचे ठाणेदार राजेंद्र पाठक आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. आरोपींनी पप्पूचा गळा कापला होता. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. पोलीस पोहचेपर्यंत तेथे बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. पोलिसांनी मृतदेह मेडिकलमध्ये पाठवला. ईकडे आरोपींची शोधाशोध करून शूभम आणि योगेशला ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त बी. जी. गायकर, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी ठाण्यात भेट देऊन त्याची विचारपूस केली. आरोपींनी हत्येची कबुली दिली असून, पप्पूने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने आपण दहशतीत आलो होतो. त्याची गुन्हेगारी वृत्ती बघता तो आपला गेम करेल, अशी भीती होती त्यामुळे आपणच त्याचा गेम केल्याचे पोलिसांना सांगितले.
अट्टल गुन्हेगार, पोलिसांचा टिपर !
कुख्यात पप्पू अट्टल गुन्हेगार होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्याने गुन्हे करून पैसे कमविण्याऐवजी पोलिसांची मुखबिरी करून रक्कम उकळणे सुरू केले होते. पोलिसांना तो गुन्हेगारांची, अवैधधंद्याची माहिती देत होता. वादग्रस्त मालमत्तेत मध्यस्थी करून तो मोठी रक्कम उकळत होता. चोरीच्या मालाची विल्हेवाट लावण्यातही तो सराईत होता. त्याच्या अलिकडच्या हालचाली बघता गुन्हेगारी वर्तुळात त्याला पोलिसांचा खब-या (टिपर) म्हणून ओळखले जात होते. हत्येच्या काही वेळेपुर्वीच तो प्रतापनगर पोलीस ठाण्यातून निघाला होता.
पप्पू, ब्लेड अन् घाव !
मृत पप्पूला आरती नामक पहिली पत्नी आणि अक्षरा व प्रणय नामक मुलगा आहे. ते लोखंडेनगरात राहतात. दुसरी पत्नी स्रेहा मुलगी सोहम गोपालनगरात राहतात. त्याने सुनीता नामक विवाहितेशी सूत जुळवून तिच्याच घरात ठिय्या मांडला होता. त्यावरून तिच्या पतीसोबत त्याचा वादही होत होता. मात्र, पप्पू गुन्हेगार असल्याने सुनीताचा पती त्याला घाबरत होता. कुख्यात पप्पूजवळ नेहमी ब्लेडचा तुकडा राहायचा. तो तुकडा तो तोंडात लपवून ठेवायचा. सुनीताच्या घरी जाऊ नये म्हणून दोन्ही बायकांनी सुनीताची काही दिवसांपूर्वी झाडाझडती घेतली होती. त्यामुळे सुनीताने त्याला भेटण्यास मज्जाव केला होता. परिणामी तिच्या प्रेमात त्याने स्वत:वर ब्लेडचे घाव मारून घेतले होते. पाच वर्षांपूर्वी गुन्हे शाखेने अटक केली असता तेथेही त्याने स्वत:वर ब्लेडचे घाव मारून पोलिसांवर दडपण आणले होते.