नागपुरात कुख्यात विजय मोहोडची अपहरण करून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:24 PM2019-06-17T23:24:46+5:302019-06-17T23:25:08+5:30
हुडकेश्वरमधील एका कुख्यात गुंडाचे अपहरण करून त्याच्या प्रतिस्पर्धी ‘बिट गँग’मधील गुंडांनी त्याची निर्घृण हत्या केली. विजय नारायण मोहोड (वय २७) असे मृताचे नाव असून तो नरसाळ्यातील जुनी वस्तीत राहत होता. गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या ‘बिट गँग’मधील आरोपी अभय राऊत, बॉबी धोटे, निखिल तिडके, लल्ला मिश्रा, काल्या शाहू, दिलीप ठवकर, सूरज कार्लेवार आणि त्यांच्या १० ते १५ साथीदारांचा या अपहरण आणि हत्याकांडात सहभाग असल्याची जोरदार चर्चा गुन्हेगारी वर्तुळात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हुडकेश्वरमधील एका कुख्यात गुंडाचे अपहरण करून त्याच्या प्रतिस्पर्धी ‘बिट गँग’मधील गुंडांनी त्याची निर्घृण हत्या केली. विजय नारायण मोहोड (वय २७) असे मृताचे नाव असून तो नरसाळ्यातील जुनी वस्तीत राहत होता. गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या ‘बिट गँग’मधील आरोपी अभय राऊत, बॉबी धोटे, निखिल तिडके, लल्ला मिश्रा, काल्या शाहू, दिलीप ठवकर, सूरज कार्लेवार आणि त्यांच्या १० ते १५ साथीदारांचा या अपहरण आणि हत्याकांडात सहभाग असल्याची जोरदार चर्चा गुन्हेगारी वर्तुळात आहे.
विजय मोहोड हा कुख्यात गुन्हेगार होता. त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी वसुलीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. रविवारी रात्री ७.३० च्या सुमारास विजय मोहोड, त्याचा मित्र रूपेश बोंडे आणि चंद्रशेखर वैद्य हे तिघे विजयच्या डस्टर कारमध्ये बसून हुडकेश्वरच्या अमित भोजनालयात आले होते. त्यांचा ओल्या पार्टीचा बेत होता. ते आपसात गंमतजंमत करीत असतानाच चार ते पाच वाहनातून उपरोक्त गुन्हेगार त्यांच्या साथीदारांसह खाली उतरले. त्यांनी विजयला शस्त्राचा धाक दाखवून जबरदस्तीने उठविले आणि आपल्या वाहनात बसविले. तेथून ते वेगात पळून गेले. विजयचे अपहरण करणाऱ्यांचे मनसुबे लक्षात आल्याने रूपेश बोंडेने विजयचा चुलतभाऊ देवीदास विठोबा मोहोड (वय ४९) यांना फोन करून विजयच्या अपहरणाची माहिती दिली. देवीदास यांनी पोलिसांना कळविले. हुडकेश्वर पोलिसांनी लगेच विजयचा शोध घेण्यासाठी धावपळ सुरू केली. माहिती कळताच गुन्हे शाखा आणि वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनीही धावपळ सुरू केली. बिट गँगच्या गुन्हेगारांनी अपहरण केल्याचे कळल्याने ते विजयचा गेम करणार असा अंदाज आल्याने शहर तसेच ग्रामीण पोलिसांनीही शोधाशोध केली. मात्र, विजयचा पत्ता लागला नाही. आज सकाळी वेळाहरी (बेसा) परिसरातील एका शेतात विजयचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडून दिसला. नागरिकांनी लगेच हुडकेश्वर पोलिसांना कळविले. पोलिसांचा भलामोठा ताफा तिकडे धावला. विजयचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी तो मेडिकलला पाठविला.
क्रिकेट सट्टा आणि जुगार अड्डा
या अपहरण आणि हत्याकांडामागे गुन्हेगारांमधील आपसी वैमनस्य कारणीभूत असल्याची गुन्हेगारी वर्तुळात चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बिट गँगचा म्होरक्या स्वप्निल क्रिकेट बुकी आहे. निखिल तिडके त्याची लाईन चालवतो. त्याच्याकडे काही दिवसांपूर्वी सारंग ठवकर नामक तरुण लाखोंची रोकड हरला होता. ही रक्कम वसूल करण्यासाठी सारंगला निखिलसह बिट गँगच्या गुंडांनी बेदम मारहाण केली होती. त्यामुळे सारंगने विजय मोहोडला मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. विजयने यात मांडवली करण्याचा प्रयत्न केल्यामुळे बिट गँगच्या गुंडांनी त्याला टार्गेट केले होते.
या एका वादासोबतच हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खरसोलीत अभय राऊत तर विजय मोहोड हिंगण्यातील धामना गावाजवळ मोठा जुगार अड्डा चालवितात. रोज लाखोंची हारजित आणि हजारोंची नाल (कट्टा) निघत असल्याने अभय राऊतने विजयला खरसोलीजवळ पुन्हा एक जुगार अड्डा सुरू करण्याची ऑफर दिली होती. मात्र, विजयने अभयची ऑफर धुडकावून लावल्याने अभय आणि विजय या दोघांमधील वैमनस्य टोकाला गेले होते.
डान्सबारमध्ये ठिणगी
दोन आठवड्यांपूर्वी विजय मोहोड साथीदारांसह बुटीबोरीच्या डान्सबारमध्ये गेला होता. त्यावेळी तेथे रेड्डी, अभय, दिलीप, लल्ला आणि गोंडेही होता. तेथेही विजयचा दिलीप ठवकर आणि अभय राऊतसोबत वाद झाला होता. विजय हावी होत चालल्याने बीट गँगमध्ये अस्वस्थता होती. विजयवर अनेक गुन्हे दाखल होते. त्याचा गेम केला नाही तर तो आपल्यातील एखाद्याची विकेट घेईल, अशी भीती म्होरक्यासह बीट गँगमधील अनेकांना वाटत होती. त्यामुळे डान्सबारमधील बाचाबाचीनंतर विजय मोहोडच्या हत्येचा कट रचण्यात आला. तशी संधी शोधली जाऊ लागली. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी कटाच्या सूत्रधाराने ग्रीन सिग्नल देताच १५ ते २० गुन्हेगारांनी मोहोडच स्पॉट लावला. त्याला एक कोट्यवधींची जमीन दाखवण्याच्या नावाखाली बोलविण्यात आले. मात्र, मोहोडने प्रतिसाद न दिल्यामुळे त्याला रविवारी रात्री सावजीमधून उचलण्यात आले आणि त्याची हत्या करून मृतदेह शेतात फेकून देण्यात आला.
गुन्हेगारी वर्तुळातील चर्चा खरी
विजय मोहोडचे अपहरण झाल्याच्या काही वेळेनंतर उपराजधानीतील गुन्हेगारी वर्तुळात त्याची हत्या झाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. तसे मेसेजही व्हायरल झाले होते. मात्र, मृतदेह मिळाला नसल्याने तसेच मोहोडचा मोबाईल सुरू (रिंग जात असल्याने) तर आरोपींचे मोबाईल बंद असल्याने पोलीस ते मानायला तयार नव्हते. मात्र, सोमवारी सकाळी मोहोडचा मृतदेह सापडल्याने गुन्हेगारी वर्तुळातील चर्चा खरी ठरली. मोहोडच्या शरीरावर ३० ते ४० घाव आहेत. तो वाचला तर आपल्याला जिवंत सोडणार नाही, अशी भीती असल्याने ठार झाल्याची खात्री पटल्यानंतरच आरोपी तेथून पळून गेले. दरम्यान, मृतदेह मिळाल्याचे समजताच मोहोडचे साथीदार मोठ्या संख्येने घटनास्थळी तसेच रुग्णालयाकडे धावले. तो राहत असलेल्या नरसाळा परिसरातही मोठी गर्दी जमली. तणाव वाढत असल्याचे लक्षात आल्याने, पोलिसांचा मोठा ताफा त्या भागात तैनात करण्यात आला.
टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता
मोहोडकडे साथीदारांची मोठी फौज होती. त्याने काही दिवसांपूर्वी कुख्यात मारुती नव्वाचे अपहरण करून त्याची बेदम धुलाई केली होती. या गुन्ह्यात तो काही तासातच पोलिसांच्या कोठडीतून बाहेर आला होता. त्यात अलीकडे त्याने सामाजिक कार्यात मोठ्या रकमेची मदत करणे सुरू केल्याने मोठ्या प्रमाणात तरुण त्याच्यासोबत जुळले होते. त्याची हत्या झाल्यामुळे आणि ती बीट गँगने केल्याच्या वार्तेने टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सरेंडर पॉलिसीची शक्यता
मोहोडची हत्या पूर्ण कटकारस्थान करूनच करण्यात आली. यात १५ ते २० गुन्हेगारांचा समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांना २४ तासानंतरही गुन्हेगार किती आहेत, त्याची संख्या माहीत नव्हती. रात्रीपर्यंत कुणाला अटकही झाली नसल्याचे पोलीस सांगत होते. पोलिसांची दिशाभूल करून आपल्या साथीदारांना वाचविण्यासाठी मोहोडचा गेम वाजविणारे आरोपी सरेंडर पॉलिसी राबविणार असल्याची चर्चाही गुन्हेगारी वर्तुळात सुरू झाली होती.