पांढराबोडीत कुख्यात गुंडाचा खून ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:06 AM2021-07-09T04:06:48+5:302021-07-09T04:06:48+5:30
नागपूर : अवैध दारूविक्रीतून सुरू असलेल्या टोळीयुद्धात अंबाझरी ठाण्यांतर्गत पांढराबोडीमध्ये कुख्यात गुंड अक्षय जयपुरेचा खून करण्यात आला. बुधवारी रात्री ...
नागपूर : अवैध दारूविक्रीतून सुरू असलेल्या टोळीयुद्धात अंबाझरी ठाण्यांतर्गत पांढराबोडीमध्ये कुख्यात गुंड अक्षय जयपुरेचा खून करण्यात आला. बुधवारी रात्री ९.३० वाजता घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले.
अजयनगर हिलटॉप येथील रहिवासी ३० वर्षांचा अक्षय बाबूलाल जयपुरे कुख्यात गुंड आहे. त्याच्याविरुद्ध खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचा पांढराबोडी परिसरात दबदबा आहे. त्याला एमपीडीए अंतर्गत नाशिकच्या तुरुंगातही पाठविण्यात आले होते. सहा महिन्यांपूर्वी त्याची सुटका झाली होती, त्यानंतर तो पुन्हा सक्रिय झाला. अवैध दारूविक्रीतून त्याची परिसरातील प्रतिस्पर्ध्यांशी वाद सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. याच वादातून पांढराबोडीच्या सुदामनगरीत अक्षयवर हल्ला करण्यात आला. शस्त्र आणि सिमेंटच्या विटांनी वार करून अक्षयचा खून करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. सात ते आठ जणांनी अक्षयवर हल्ला केल्याची माहिती आहे. ते अनेक दिवसांपासून अक्षयचा खून करण्याच्या प्रयत्नात होते. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. घटनास्थळाच्या जवळच एका महिलेचा गांजाचा अड्डा आहे. पांढराबोडी परिसर नेहमीच अवैध धंदे आणि गँगवार यामुळे चर्चेत राहिला आहे. येथे अनेकदा खुनाच्या घटनाही घडल्या आहेत. यामुळे वस्तीत पोलीस चौकी लावण्यात आली आहे. तरीसुद्धा पोलिसांना गुन्हेगारांमध्ये सुरू असलेल्या वादाची माहिती मिळत नाही. पांढराबोडीत अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत. अनेक ठिकाणी खुलेआम दारूसोबत खाण्यासाठी लागणारे खाद्यपदार्थ विकले जातात. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती मिळत नाही. पांढराबोडीत आगामी काही दिवसांत गंभीर घटना घडणार असल्याची शंका सूत्रांनी व्यक्त केली आहे.
............