नागपुरातील कुख्यात सुमीत ठाकूरला सिनेस्टाईल अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 01:03 AM2020-10-17T01:03:40+5:302020-10-17T01:04:51+5:30
Notorious Sumit Thakur Arrested, Crime News उपराजधानीतील कुख्यात गुंड सुमीत ठाकूर याच्या गिट्टीखदान पोलिसांनी शुक्रवारी रात्री सिनेस्टाईल मुसक्या बांधल्या. या कारवाईमुळे वर्धा मार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील कुख्यात गुंड सुमीत ठाकूर याच्या गिट्टीखदान पोलिसांनी शुक्रवारी रात्री सिनेस्टाईल मुसक्या बांधल्या. या कारवाईमुळे वर्धा मार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेला सुमीत ठाकूर नागपुरातील टॉप-१० कुख्यात गुन्हेगारांपैकी एक मानला जातो. त्याची गुन्हेगारांची एक मोठी टोळी असून, त्यात अनेक कुख्यात गुंड आहेत. सुमीतविरुद्ध गेल्या वर्षी मकोकाची कारवाई करण्यात आली होती. त्यात त्याने न्यायालयातून जामिन मिळवला होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर सुमीतचा जामिन रद्द करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले. जामिन रद्द झाल्यापासून चार महिन्यांपासून सुमीत पोलिसांशी लपंडाव खेळत होता. तो आज वर्धा मार्गाने येणार असल्याची माहिती एनपीसी मनजीत ठाकूर यांना मिळाली. त्यांनी ती वरिष्ठांना सांगितली. त्यानुसार, पोलीस उपायुक्त विनीता साहू, गिट्टीखदानचे ठाणेदार सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार अनिल त्रीपाठी, एनपीसी मनजितसिंग ठाकूर, बलजीत ठाकूर, वैभव, नीलेश इंगोले यांनी शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास सुमीत ठाकूरचा पाठलाग सुरू केला. पोलीस मागे लागल्याचे लक्षात आल्यामुळे सुमीत त्याच्या स्कोडा कारने (एमएच ४०/ एन ९०५५) वेगात वर्धा मार्गाने निघाला. मात्र, पोलीस पथकाने जीवाची बाजी लावत त्याचा पाठलाग करून गुरुमीत ढाब्याजवळ त्याच्या मागेपुढे आपल्या दुचाक्या लावून त्याला सिनेस्टाईल थांबवले. दरम्यान, काही तरी गडबड झाल्याचे लक्षात आल्याने घटनास्थळ परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुमीतला ताब्यात घेऊन गिट्टीखदान ठाण्यात नेण्यात आले. वृत्तलिहिस्तोवर त्याची पोलीस चौकशी करीत होते.
साथीदार पळाले
सुमीतचे साथीदार दुस-या एका कारमध्ये त्याच्या सोबत होते. पोलिसांनी ढाब्याजवळ त्याला ताब्यात घेताच त्याच्या साथीदार दुस-या एका कारमदून वेगात पळून गेले.