आता चण्यावर ६० टक्के आयात शुल्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 11:45 PM2018-03-03T23:45:42+5:302018-03-03T23:45:59+5:30
केंद्र सरकारने होळीच्या एक दिवसाआधी चण्यावरील आयात शुल्कात वाढ करून ते ६० टक्क्यांवर नेले आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारने होळीच्या एक दिवसाआधी चण्यावरील आयात शुल्कात वाढ करून ते ६० टक्क्यांवर नेले आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. सध्या चण्याची आधारभूत किंमत ४,४०० रुपये आहे. पण बाजारपेठेत प्रति क्विंटल ३,९०० रुपयात विक्री सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना तोटा व्हायचा.
द होलसेल ग्रेन अॅण्ड सीड्स मर्चंट्स असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी सांगितले की, सरकारचा आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय योग्य, स्वागतार्ह आणि शेतकऱ्यांचा हितार्थ आहे. १५ मार्चपासून राज्य सरकार शेतकऱ्यांपासून ४,४०० रुपये क्विंटल दराने चण्याची खरेदी करणार आहे. यंदा देशात चण्याचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे केंद्र सरकारने विदेशातून चण्याची आयात पूर्णपणे थांबवावी. याच कारणांमुळे केंद्र सरकार आयात शुल्कात निरंतर वाढ करीत आहे. डिसेंबर २०१७ मध्ये मसूरसोबतच चण्यावर ३० टक्के आयात शुल्क आकारले होते. फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यात वाढ करून ४० टक्क्यांवर नेले. आता आणखी २० टक्के वाढवून ६० टक्के केले आहे. घरगुती बाजारात चण्याचे भाव आधारभूत किमतीपेक्षा कमी झाल्यामुळे सरकार चिंतित होती. नवीन पीक कापण्याची तयारी सुरू झाली आहे. काही दिवसांत कापणीचा वेग वाढल्यानंतर चण्याच्या किमतीवर दबाव आणखी वाढणार आहे.
केंद्राच्या निर्णयामुळे आॅस्ट्रेलिया आणि अन्य देशांतून स्वस्त किमतीतील चण्याची आयात थांबेल आणि त्यामुळे बाजारात किमती स्थिर राहतील. केंद्राने काबुली चण्याच्या आयातीवर ४० टक्के आयात शुल्क लावले आहे. यावर्षी चण्याचे उत्पादन विक्रमी १११ लाख टनावर जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे देशांतर्गत भाव कमी होतील, पण आयात शुल्क वाढविल्यामुळे भाव स्थिर राहतील. सन २०१६-१७ मध्ये ९३.५० लाख टन उत्पादन झाले होते. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये नवीन पिकाची आवक सुरू झाली आहे. आयात शुल्कवाढीचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे.