आता मायनस डिग्रीमध्येही ठेवता येणार औषधींचा मोठा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2022 09:46 PM2022-10-10T21:46:21+5:302022-10-10T21:46:54+5:30
Nagpur News ‘वॉकिंग कुलर’ हे यंत्र उपलब्ध झाल्याने मोठ्या संख्येत औषधांची साठवणूक करणे आता शक्य होणार आहे. सोमवारी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्या हस्ते ‘वॉकिंग कुलर’चे उद्घाटन झाले.
नागपूर : मेडिकलच्या औषधशास्त्र (फार्माकोलॉजी) विभागात ‘वॉकिंग कुलर’ नसल्याने महत्त्वाची इंजेक्शन, सलाईन व जीवनरक्षक औषधींना विशिष्ट तापमानात ठेवताना विभागाची तारांबळ उडायची. तब्बल सात वर्षांनंतर हे यंत्र उपलब्ध झाल्याने मोठ्या संख्येत औषधांची साठवणूक करणे आता शक्य होणार आहे. सोमवारी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्या हस्ते ‘वॉकिंग कुलर’चे उद्घाटन झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुनील महाकाळकर, तर प्रमुख पाहुणे उपअधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहुरे उपस्थित होते. डॉ. गजभिये म्हणाले, मेडिकलमध्ये लागणाऱ्या औषधांची संख्या मोठी आहे. यातील काही औषधांना विशिष्ट तापमानाची गरज पडते. महत्त्वाचे म्हणजे, काही इंजेक्शन ‘मायनस डिग्री’ तापमानात ठेवावे लागतात. यासाठी ‘वॉकिंग कुलर’ गरजेचे असते. याचे महत्त्व ओळखून विभागाला हे यंत्र उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे आता जीवनरक्षक औषधी व इंजेक्शनचा अधिकचा औषधींचा साठा करून ठेवण्यास मदत होईल. प्रास्ताविक डॉ. अविनाश तुरणकर यांनी केले. संचालन डॉ. राकेश कुमरे यांनी, तर आभार डॉ. वेणुगोपाल शर्मा यांनी मानले. यावेळी डॉ. स्मिता सोनटक्के, डॉ. ज्योत्स्ना सोमकुवर, डॉ. रुद्रेश चक्रवर्ती, डॉ. सोनाली पिंपरकुटे, डॉ. चेतना मेश्राम, डॉ. जफर अहमद, डॉ. तारकेश्वर गोडघाटे व डॉ. मुरारी सिंह उपस्थित होते.