पुरुष व वयोवृद्धांसाठी आता ‘आधार सेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 10:54 AM2018-03-15T10:54:19+5:302018-03-15T10:54:28+5:30
भरोसा सेलच्या धर्तीवर प्रत्येक जिल्हास्तरावर आधार सेल स्थापन केला जात आहे. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसोबतच मानसोपचार तज्ज्ञ, तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक अशा तज्ज्ञ मंडळींच्या पॅनलकडून आलेल्या समस्यांचे निराकरण केले जाणार आहे.
सुरेंद्र राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कुटुंबामध्ये रक्ताच्या नात्यातच अनेकदा गुंतागुंत निर्माण होते. गैरसमजातून आई-वडील व मूल एकमेकांपासून दुरावताच. बरेचदा ज्येष्ठ पुरुषाला अपमानजनक वागणूक मिळते. दाम्पत्याच्या या विसंवादात वयोवृद्ध मात्यापित्यांची प्रचंड हेळसांड होते. या समस्येची उकल करण्यासाठी प्रत्येक जिल्हा मुख्यालयी आधार सेल स्थापन केले जात आहे.
पती-पत्नीतील कलह मिटविण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले महिला सेल उत्कृष्ट कार्य करत आहे. अनेकांचे संसार तुटण्यापासून वाचत आहे. याशिवाय कौटुंबिक कलहातून निर्माण होणारे गुन्ह्यांना प्रतिबंध घालता येतो. याच धर्तीवर नागपूरमध्ये भरोसा सेल सुरू करण्यात आला होता. प्रयोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या या भरोसा सेलला नागरिकातून चांगला प्रतिसाद मिळाला.
आता भरोसा सेलच्या धर्तीवर प्रत्येक जिल्हास्तरावर आधार सेल स्थापन केला जात आहे. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसोबतच मानसोपचार तज्ज्ञ, तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक अशा तज्ज्ञ मंडळींच्या पॅनलकडून आलेल्या समस्यांचे निराकरण केले जाणार आहे. यात विशेष करून पुरुषांना आपली गाऱ्हाणी मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. अनेकदा मुलांकडून किंवा सुनेकडून मिळणारी अन्यायकारक वागणूक वयोवृद्ध दाम्पत्य समाजात कुणापुढेच मांडू शकत नाही. कायद्याची मदत कुटुंबाच्या बदनामीमुळे ते स्वीकारत नाही. या स्थितीत त्यांना आधार सेलमधून योग्य मार्गदर्शन व त्यांच्या सुना व मुलांचे समुपदेशन केले जाणार आहे. पुरुषही बरेचदा पत्नीकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे त्रस्त असतात. याशिवाय वयात आलेली मुले यांचंही समुपदेशन या आधार सेलमध्ये मोफत केलं जाणार आहे. टोकाचा निर्णय घेण्यापूर्वीच दोन्ही बाजूंना योग्य समुपदेशन करून चुका कशा टाळाव्यात याबाबत याचे मार्गदर्शन या आधार सेलमध्ये केले जाणार असल्याचे महिला सेलमधील सहायक पोलीस निरीक्षक विजया पंधरे यांनी सांगितले.