आता १७ ऑगस्टपासून नागपूर विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 11:45 PM2020-07-31T23:45:43+5:302020-07-31T23:47:09+5:30
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या घोळामुळे शैक्षणिक सत्राची सुरुवात लांबली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०२०-२१ या वर्षासाठीचे शैक्षणिक कॅलेंडर घोषित केले होते व १ ऑगस्टपासून विषम सत्र सुरू होणार होते. परंतु आता विद्यापीठाने यात सुधारणा केली असून १७ ऑगस्टपासून विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र सुरू करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या घोळामुळे शैक्षणिक सत्राची सुरुवात लांबली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०२०-२१ या वर्षासाठीचे शैक्षणिक कॅलेंडर घोषित केले होते व १ ऑगस्टपासून विषम सत्र सुरू होणार होते. परंतु आता विद्यापीठाने यात सुधारणा केली असून १७ ऑगस्टपासून विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र सुरू करण्यात येणार आहे.
दरवर्षी शैक्षणिक सत्राची सुरुवात १५ जूनपासून होते. यंदा मात्र १ ऑगस्टपासून शैक्षणिक सत्राची सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २४ डिसेंबरपर्यंत वर्ग चालतील असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार पदव्युत्तर विभाग व महाविद्यालयांनी ‘ऑनलाईन’ वर्ग घेण्यासंदर्भात तयारीदेखील सुरु केली होती. मात्र २८ जुलै रोजी विद्यापीठाच्या विद्या परिषदेची सभा झाली व यात शैक्षणिक सत्र १७ ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय झाला. त्या अनुषंगाने शुक्रवारी विद्यापीठाने यासंदर्भात घोषणा केली. हे सत्र कधीपर्यंत चालेल हे मात्र शुद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आलेले नाही.
सुमारे दोन महिन्याच्या विलंबाने सत्र सुरू होणार आहे. या कालावधीची भरपाई विद्यापीठाच्या दिवाळी, हिवाळी व उन्हाळी सुट्या कमी करुन करण्यात येणार आहे. यावर्षी दिवाळीच्या सुट्या एक महिन्यांऐवजी एकाच आठवड्याच्या असतील तर हिवाळी सुट्या २० दिवसांच्या व उन्हाळी सुट्या एका महिन्याच्या असतील.
अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान
सत्र प्रणालीनुसार महाविद्यालयांना डिसेंबर महिन्यापर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. युजीसीच्या नियमांनुसार सेमिस्टर सत्रात किमान ९० दिवसांचे शैक्षणिक सत्र व्हायला हवे. मात्र ‘कोरोना’मुळे महाविद्यालये उशिरा सुरू झाली किंवा विद्यार्थी उशिरा आले तर सत्र कसे पूर्ण होणार हादेखील एक प्रश्नच आहे. ग्रामीण भागात ‘ऑनलाईन’ वर्ग घेण्यास अडचणी येऊ शकतात.