आता शुल्काविना मिहानमध्ये मालवाहक वाहनांना प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:13 AM2021-09-17T04:13:30+5:302021-09-17T04:13:30+5:30
वसीम कुरैशी नागपूर : मिहान-सेझमध्ये काही दिवसाआधी गेटपास आणि मालवाहक वाहनांच्या प्रवेशासाठी करण्यात येणाऱ्या शुल्क वसुलीवर आता विराम लागला ...
वसीम कुरैशी
नागपूर : मिहान-सेझमध्ये काही दिवसाआधी गेटपास आणि मालवाहक वाहनांच्या प्रवेशासाठी करण्यात येणाऱ्या शुल्क वसुलीवर आता विराम लागला आहे. विकास आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्याने एक बसमध्ये चढून कंपनी सर्व कर्मचाऱ्यांचे पास जमा केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला सुरक्षा पदावरून हटवून नवीन कर्मचाऱ्याची नियुक्त करण्यात आली आहे. आता शुल्काविना मिहानमध्ये मालवाहक वाहने प्रवेश करीत आहेत.
लोकमतने ३ सप्टेंबरच्या अंकात ‘शुल्क घेऊन होताहेत मालवाहक वाहनांची एन्ट्री’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर विकास आयुक्त कार्यालयाने यावर तातडीने निर्णय घेत सुरक्षेचा भार नवीन कर्मचाऱ्यावर सोपविला आहे.
आता या ठिकाणी इन-आऊट पास यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत सुरक्षा गेटवर फोटो आयडीसह पास तयार करावी लागते. ज्यांच्याशी भेटायचे आहे, त्यांची स्वाक्षरी घेऊन परत त्याच गेटने परत जावे लागते. विकास आयुक्त कार्यालयातील ज्या कार्यालयीन सहायकावर जबाबदारी सोपविली होती, त्याच्या कार्यप्रणालीच्या तक्रारी वाढल्या होत्या. लोकमतने बातमी प्रकाशित केल्यानंतर जबाबदारीतून त्याला कार्यमुक्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मिहान-सेझमध्ये गुंतवणूक कंपन्यांना माल आणि कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. तसेच त्यांच्याकडून शुल्क वसुली वृक्षारोपणाच्या नावाखाली करण्यात येत होती. या शुल्कातून आतापर्यंत किती वृक्षारोपण केले, हे स्पष्ट झालेले नाही. मनमानी करून वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात येऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
शुल्काची तरतूद नाही
मालवाहक वाहने आणि कर्मचाऱ्यांच्या गेटपासकरिता शुल्क वसुलीची कोणतीही तरतूद नाही. भविष्यात मिहान-सेझमध्ये पुन्हा डिफेन्स प्रकल्प येणार आहेत. त्यामुळे सुरक्षा वाढविण्यासह ये-जा करिता नवीन व्यवस्था करण्यात येईल.
शर्मन रेड्डी, विकास आयुक्त, सेझ.