आता खुल्या मिठाईवरही टाका ‘एक्सपायरी डेट’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 09:20 PM2020-09-29T21:20:32+5:302020-09-29T21:21:41+5:30
मिठाईच्या दुकानातील 'ट्रे'वर किंवा डब्यांवर आता मिठाई किती तारखेपर्यंत वापरली जाऊ शकते, अर्थात या मिठाईची ‘एक्सपायरी डेट’ काय आहे, कधीपर्यंत खाण्यासाठी योग्य आहे, याची तारीख टाकण्याचे निर्देश अन्न व औषधी प्रशासनाने दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिठाईच्या दुकानातील 'ट्रे'वर किंवा डब्यांवर आता मिठाई किती तारखेपर्यंत वापरली जाऊ शकते, अर्थात या मिठाईची ‘एक्सपायरी डेट’ काय आहे, कधीपर्यंत खाण्यासाठी योग्य आहे, याची तारीख टाकण्याचे निर्देश अन्न व औषधी प्रशासनाने दिले आहे.
अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण नवी दिल्ली यांनी जारी केलेल्या नवीन निर्णयानुसार स्थानिक मिठाईच्या दुकानात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार १ आॅक्टोबर २०२० पासून सर्व मिठाई विक्रेत्यांनी मिठाईसाठी मुदतबाह्य (बेस्ट बीफोर डेट) तारीख प्रदर्शित करणे आवश्यक आहे. आतापर्यंत पॅकेटबंद खाद्यपदार्थ अथवा मिष्टान्नाच्या पाकिटांवर मुदतबाह्य तारीख नमूद करणे बंधनकारक होते. मात्र अलीकडे खुल्या पध्दतीने विक्री होणाऱ्या मिष्टान्नातून अन्न विषबाधा होण्याचे प्रकार उजेडात आल्याने शासनाने मुदतबाह्य तारीख टाकणे बंधनकारक केले आहे. विना पॅकिंग असणारा पदार्थ कधी बनविला आहे अथवा तो किती दिवस खाण्यासाठी उपयुक्त आहे हे ग्राहकांना माहिती नसते. शिळे अन्नपदार्थ खाल्ल्याने विषबाधा होऊ शकते. त्यामुळे ट्रेमधील अन्नपदार्थ विक्री करताना मुदत संपत असल्याची तारीख लिहिल्यास खराब मिठाईची विक्री होणार नाही. जिल्ह्यातील मिठाई उत्पादक व विक्रेते यांनी या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त यांनी केले आहे.