आता अँजिओप्लास्टी होणार ५० हजार रुपयांनी स्वस्त

By admin | Published: February 15, 2017 03:06 AM2017-02-15T03:06:13+5:302017-02-15T03:06:13+5:30

हृदयरोगाच्या रुग्णांसाठी जीवनदायी ठरलेली ‘कोरोनरी स्टेंट’च्या व्यवसायातील नफाखोरीला अखेर लगाम लागला आहे.

Now angioplasty will cost Rs 50,000 cheaper | आता अँजिओप्लास्टी होणार ५० हजार रुपयांनी स्वस्त

आता अँजिओप्लास्टी होणार ५० हजार रुपयांनी स्वस्त

Next

‘एनपीपीए’च्या आदेशामुळे हृदय रुग्णांना फायदा
नागपूर : हृदयरोगाच्या रुग्णांसाठी जीवनदायी ठरलेली ‘कोरोनरी स्टेंट’च्या व्यवसायातील नफाखोरीला अखेर लगाम लागला आहे. केंद्राच्या रसायन व खते मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ‘नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अ‍ॅथारिटी’ने (एनपीपीए) स्टेंटच्या किमती निश्चित केल्या आहेत. नवीन दर १४ फेब्रुवारी २०१७ पासून लागू करण्यात आले आहेत. दरांमध्ये साधारण ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत कपात झाली आहे. परिणामी, हृदयरोगाचा उपचार ४० ते ५० हजार रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे.
‘मेडिकल हब’च्या रुपात नागपूर विकसित होत आहे. येथे हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भातून रुग्ण येतात.
सरकारच्या या निर्णयाचे उपराजधानीत सामान्य नागरिक स्वागत करीत असले तरी वैद्यकीय क्षेत्रात मिश्र प्रतिक्रिया आहेत. शहरात महिन्याकाठी साधारणत: ५०० वर अँजिओप्लास्टी होतात. एका अँजिओप्लास्टीसाठी सुमारे दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो.

म्हणजेच महिन्याची उलाढाल कित्यके कोटी रुपयापर्यंत जाते. यात सर्वात मोठा ‘स्टेंट’चा वाटा असतो. शहरात ‘स्टेंट’ची किमत १५ हजार ते दीड लाखांच्या घरात आहे. साधारण ४० ते ५० रुपयांच्या ‘स्टेंट’चा उपयोग सर्वात जास्त होतो. परंतु आता याच्या किमती निश्चित करण्यात आल्याने अँजिओप्लास्टी सामान्यांच्या आवाक्यात आल्याचे बोलले जात आहे.
‘एनपीपीए’कडून काढण्यात आलेल्या आदेशानुसार ‘बायोरिसोर्सेबल’ किंवा ‘बायोडिग्रीडेबल स्टेंट’ची कमाल किमत २९६०० रुपये व उघड्या धातूच्या ‘ड्रग इल्यूटिंग स्टेंट’ची (डेस) किमत ७२६० रुपये निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ‘स्टेंट’वर ६५० टक्क्यांपर्यंतचा नफा कंपन्यांना मिळत असल्याचे प्राधिकरणाला आढळून आले. यामुळेच याचे दर निश्चित करण्यासाठी मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. बाजारात ‘डेस स्टेंट’ २० हजार ते १.५० लाख रुपयांपर्यंत तर ‘बायोरिर्सोसेबल’ किंवा ‘बायोडिग्रीडेबल’ स्टेंट १.७५ लाख ते दोन लाख रुपयांपर्यंत उपलब्ध होते.

अद्यावत ‘स्टेंट’साठी सूट द्यायला हवी होती : डॉ. अर्नेजा
प्रसिद्ध हृदयरोग विशेषज्ञ डॉ. जसपाल अर्नेजा म्हणाले, सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. उपचार स्वस्त झाल्याने जास्तीतजास्त रुग्णांचा याचा फायदा होईल. जागतिकस्तरावर वैद्यकीय क्षेत्रात नवनवे बदल होतात. ‘स्टेंट’मध्येही नेहमीच नवे बदल होत आले आहेत. अनेक रुग्ण महागडे स्टेंट लावण्यास तयार असतात. परंतु सरकारच्या या निर्णयामुळे भारतात अद्यावत स्टेंट उपलब्ध होऊ शकणार नाही. अद्यावत स्टेंट वापरणाऱ्यांना यात सूट द्यायला हवी होती. ‘स्टेंट’ हे सव्वा दोन मिमी पासून ते चार मिमी आकारात येतात.

‘स्टेंट’चे दर निश्चित करायला नको होते : डॉ. संचेती
‘इंडियन असोसिएशन आॅफ कार्डिओथोरॅसिक सर्जन्स’चे अध्यक्ष व हृदय शल्यचिकित्सक डॉ. आनंद संचेती म्हणाले, ‘स्टेंट’चे अनेक प्रकार आहेत. ज्याच्या किमती १५ हजारांपासून ते १.४० लाखापर्यंत आहेत. सरकारने घेतलेला निर्णय स्तुत्य असला तरी स्टेंटची किंमत ३० हजार रुपये निश्चित करायला नको होती. कारण या किमतीमध्ये मिळणाऱ्या स्टेंटच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकतात. जर कुणा रुग्णाला अधिक गुणवत्तापूर्ण आणि महागडा स्टेंट वापरायचा असेल तर त्यापासून तो वंचित राहू शकतो. स्टेंटचे दर निश्चित न करता त्यात लवचिकता ठेवायला हवी होती. सरकारने या संदर्भात विचार करायला पाहिजे.

शस्त्रक्रियेचा खर्च होणार कमी : डॉ. तिवारी
‘इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट’ डॉ. नितीन तिवारी म्हणाले, प्राधिकरणाच्या आदेशामुळे स्टेंटच्या किमती एक तृतीयांशने कमी होण्याची शक्यता आहे. शस्त्रक्रियेच्या दरम्यान ‘वायर’, ‘बलून’, औषधे लागतात. रुग्णालयाचा खर्च, अन्य शुल्क जोडून दीड ते दोन लाख रुपयांमध्ये ‘अँजिओप्लास्टी’ होते. यात स्टेंटचे दर कमी झाल्यास निश्चित स्वरुपात रुग्णांना याचा फायदा होईल.

प्रक्रिया शुल्क वाढणार ?
प्राधिकरणाने स्टेंटच्या किमती निश्चित केल्या आहेत. या आदेशाची अंमलबजावणीही होईल, परंतु अँजिओप्लास्टीचे प्रक्रिया शुल्क वाढवून खासगी रुग्णालय आपले शुल्क कायम ठेवण्याची शक्यता आहे. उदा. अँजिओप्लास्टीमध्ये ४० हजाराचे ‘स्टेंट’ व ६० हजार रुपये प्रक्रिया शुल्क असे घेतले जायचे. परंतु आता ‘स्टेंट’चे दर ३० हजार रुपये निश्चित झाल्याने प्रक्रिया शुल्क १० ते १५ हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

नागपुरात दर महिन्याला ६०० अँजिओप्लास्टी
शहरात सुमारे २० ‘कॅथलॅब’ आहेत, जिथे अँजिओप्लास्टी होते.
वैद्यकीय सूत्रानुसार शहरात महिन्याला ५०० ते ६०० अँजिओप्लास्टी होतात. यानुसार दर दिवशी १५ ते २० रुग्णांवर ही शस्त्रक्रिया केली जाते.
हृदयाच्या रक्त वाहिनीतील अडथळ्याशी जुळलेल्या ८० टक्के प्रकरणात ‘अँजिओप्लास्टी’चा वापर होतो. उर्वरित रुग्णांना ‘बायपास’ व ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रिया करावी लागते.

Web Title: Now angioplasty will cost Rs 50,000 cheaper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.