आता रंगकर्मीही गिरवणार संस्कृतचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 11:42 AM2020-02-05T11:42:35+5:302020-02-05T11:44:57+5:30
संस्कृतच्या प्रचार-प्रसारार्थ शाळांसोबतच नाट्यमंडळींना संस्कृतकडे आकर्षित करण्यासाठी देशभरात विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात नागपुरातून होत आहे.
प्रवीण खापरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संस्कृतच्या प्रचार-प्रसारार्थ काम करणाऱ्या संस्कृत भाषा प्रचारिणी सभेच्यावतीने रंगकर्माकडे विशेष लक्ष पुरविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने, शाळांसोबतच नाट्यमंडळींना संस्कृतकडे आकर्षित करण्यासाठी देशभरात विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात नागपुरातून होत आहे.
भारताची मूळ भाषा आणि प्रमाण भाषांची जननी म्हणून संस्कृतकडे बघितले जाते. संस्कृत ही केवळ धार्मिक अनुष्ठानांची नव्हे तर आरोग्यवर्धक भाषा म्हणूनही आधुनिक ठोकताळ्यात मान्यता पावली आहे. प्राचीन काळी अनेक वैज्ञानिकांनी प्रयोगांची मांडणीही संस्कृतमध्येच केली गेली आहे. सर्वात जुन्या नाटकांची भाषाही संस्कृतच होती, हे आपल्याकडील भरतमुनी, भास, कालिदास, भवभूती यांच्या नाट्यसंहितांवरून स्पष्ट होते. मात्र काळाच्या ओघात ही भाषा विशिष्ट वर्गापुरती मर्यादित झाली आणि सामान्यांपासून दूर होत गेली. ही मरगळ दूर करण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या स्तरावर होतच आहे.
मात्र, जोवर कलावंत संस्कृतबाबत आस्था दाखवत नाहीत, तोवर संस्कृत सर्वसामान्यांच्या तोंडी बसणार नाही, ही जाणीव संस्कृत भाषा प्रचारिणी सभेला झाली आहे. त्याच अनुषंगाने, समाजाचे विषय आस्थेने रंगमंचावर मांडणाºया नाटुकल्यांना संस्कृतचे धडे देण्याची तयारी सभेने दाखवली आहे.
संस्कृत भाषा प्रचारिणी सभेच्या ‘रुपकोदयम्’ या नाट्यविभागाद्वारे संस्कृत नाटके सादर केली जातात. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक संचालनालयाद्वारे घेण्यात येत असलेल्या संस्कृत नाट्य स्पर्धेपुरताच हा विभाग मर्यादित झाला आहे. त्यामुळे, सभेच्या नाट्यविषयक उपक्रमांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, सभेसोबत जुळलेल्या नव्या दमाच्या संस्कृत अभ्यासकांनी पुढाकार घेतला असून, सभेला सर्वसामान्यांशी जुळण्यास प्रोत्साहित केले आहे.
त्याच दृष्टिकोनातून नाटुकल्यांवर विशेष लक्ष पुरविण्याचा निर्धार नागपूरच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचे दिसून येते. येत्या गुढीपाडव्याला सभेला व सभेद्वारे काढण्यात येत असलेल्या ‘भवितव्यम्’ या साप्ताहिकाला ७० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नाट्यसंघांना संस्कृतचे धडे देण्याच्या उपक्रमास सुरुवात होणार आहे.
‘पाथेयम्’द्वारे वैज्ञानिक प्रयोग
चंद्रगुप्त वर्णेकर व डॉ. लीना रस्तोगी प्रमुख असलेल्या ‘पाथेयम्’ विभागद्वारे संस्कृत साहित्यात आलेल्या विविध वैज्ञानिक प्रयोगांचे परीक्षण केले जातात. प्रयोगाची सत्यता तपासण्यात येऊन ते बाहेर काढले जात आहेत.
६० व्या संस्कृत राज्यनाट्य स्पर्धेला ६० नाटकांचा निर्धार - श्रद्धा तेलंग
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी कोणताही खंड न पडता संस्कृत राज्यनाट्य स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेत यंदा संपूर्ण राज्यातून केवळ २३ नाटकेच सादर झाली आणि नागपुरात केवळ तीनच. पुढच्या वर्षी ६० वी स्पर्धा असणार आहे. त्यामुळे किमान ६० संस्कृत नाटके सादर व्हावी, या हेतूपोटी संस्कृत भाषा प्रचारिणी सभेने नाटुकल्यांना संस्कृत भाषेशी जोडण्याचा उपक्रम राबविण्याचा निर्धार केला असल्याचे सभेच्या ‘भवितव्यम्’ साप्ताहिकाच्या संपादिका श्रद्धा तेलंग यांनी ‘लोकमत’कडे सांगितले. यासाठी नव्या दमाचे विनय मोडक व कल्याणी गोखले सहकार्य करत असल्याचेही त्या म्हणाल्या.
शेकडो रंगकर्मीं घेऊ शकतील लाभ
शहरात प्रत्यक्ष कार्यरत असणाऱ्या नाट्यसंस्था २०च्या जवळपास आहेत. त्यातील पाच-सहा नाट्यसंस्था वर्षभर नाट्यविषयक उपक्रम राबवित असतात तर स्पर्धेपुरते उदयास येणाऱ्या नाट्यसंस्थाही दहा-बारा आहेत. असे मिळून शेकडो रंगकर्मी रंगकर्म करत असतात. मात्र, नागपूर हा मिश्रित भाषांचा भूभाग असल्याने, हिंदी असो वा मराठी प्रत्येकालाच भाषा बोलण्याची अडचण निर्माण होतेच. हिंदी व मराठी या मूळ संस्कृतच्याच भाषा असून, लिपीही देवनागरी आहे. अशा स्थितीत संस्कृतचे धडे गिरविण्याची संधी मिळणार असल्याने, त्यांना भाषांतील जोडाक्षरे, क्लिष्ट शब्दांचे उच्चारण करण्यास मदतच होईल. शिवाय, संस्कृतचा थोडाफार अभ्यास होणार असल्याने रंगकर्मींच्या भाषाविषयक जाणिवा समृद्ध होण्यास मदतच होईल.