टॉसिलिझुमॅब इंजेक्शनचा काळाबाजार करताना सापडले होमिओपॅथी डॉक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 09:12 PM2021-05-26T21:12:08+5:302021-05-27T10:26:06+5:30
Black market of injections on mucormycosisकोरोनाच्या उपचारासाठी वापरले जाणारे टॉसिलिझुमॅब इंजेक्शन एक लाख रुपयात विकत असलेले दोन होमिओपॅथी डॉक्टर व त्यांच्या एका साथीदाराला पोलिसांनी रंगेहात अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या उपचारासाठी वापरले जाणारे टॉसिलिझुमॅब इंजेक्शन एक लाख रुपयात विकत असलेले दोन होमिओपॅथी डॉक्टर व त्यांच्या एका साथीदाराला पोलिसांनी रंगेहात अटक केली. झोन दोनच्या पथकाने अंबाझरी पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच ही कारवाई केली. सचिन अशोक गेवरीकर (वय २०), रा. मोहगाव बालाघाट, विशेष ऊर्फ सोनू जीवनलाल बाकट (२६), परसवाडा, बालाघाट आणि रामफल वैश्य (२४), रा. सिंगरौली, बालाघाट, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विशेष आणि रामफल हे होमिओपॅथी डॉक्टर आहेत.
कोविडच्या उपचारासाठी लागणारे औषध आणि इंजेक्शनचा काळाबाजार अजूनही सुरूच आहे. रेमडेसिविरप्रमाणे टॉसिलिझुमॅब हे इंजेक्शनही मोठ्या किमतीवर विकले जात आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी २२ मे रोजी पार पडलेल्या गुन्हे मीटिंगमध्ये ठाणेदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांना औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, पोलीस लक्ष ठेवून होते. डीसीपी विनिता साहू यांना टॉसिलिझुमॅब इंजेक्शन एक लाख रुपयात विकले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. या इंजेक्शनची मूळ किंमत ४०,६०० रुपये आहे. माहिती मिळताच पोलीस सतर्क झाले. पोलिसांना सचिन गेवरीकरकडे इंजेक्शन असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून सचिनशी संपर्क साधला. सचिनने एक लाख रुपये मागितले. सौदा पक्का झाला. सचिनने डमी ग्राहकाला रवीनगर चौकाजवळ बोलाविले. तिथे पैसे घेऊन इंजेक्शन देताच पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलिसांनी विचारपूस केली तेव्हा सचिनने इंजेक्शन विशेष ऊर्फ सोनू बाकटकडून मिळाल्याचे सांगितले. पोलिसांना सोनूसोबतच रामफलही सापडला. सोनूने इंजेक्शन रामफलकडून मिळाल्याचे सांगितले. पोलिसांनी रामफललाही ताब्यात घेतले. सोनू व रामफल हे बीएचएमएस आहेत. होमिओपॅथीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर दोघेही खासगी रुग्णालयात इंटर्नशिप करतात. डॉक्टर असल्याने सोनू व रामफलचा शासकीय रुग्णालयाशी संपर्क आहे. या संपर्काच्या माध्यमातूनच त्यांनी इंजेक्शन मिळविले. पोलिसांना या संबंधात काही पुरावे सापडले आहेत. त्यामुळे आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. आरोपींना न्यायालयासमोर सादर करीत तीन दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. ही कारवाई डीसीपी विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात पीएसआय कुणाल धुरट, म्हात्रे, रामदास नेरकर, आशिष वानखेडे, संतोष शेंद्रे यांनी केली.
एफडीए - प्रशासनाचे दुर्लक्ष
रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यात पोलिसांची महत्त्वाची भूमिका राहिली. एफडीए आणि स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होते. आतासुद्धा तसाच प्रकार पाहायला मिळत आहे; परंतु एफडीए व स्थानिक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले; परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा काळाबाजारही उघडकीस आला आहे.