आता नागपूर रेल्वेस्थानकावर होईल कोणत्याही हॉटेलची बुकिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 10:14 PM2019-08-07T22:14:57+5:302019-08-07T22:20:32+5:30
रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर प्रवाशांना नागपुरातील कोणत्याही हॉटेलमध्ये खोली घेण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाहेरगावावरून आलेल्या प्रवाशांना आता नागपूर शहरात राहण्यासाठी हॉटेलचा शोध घेण्याची गरज उरली नाही. रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर प्रवाशांना नागपुरातील कोणत्याही हॉटेलमध्ये खोली घेण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिली असून प्रवाशांना २४ तास ही सुविधा रेल्वेस्थानकावर उपलब्ध राहणार आहे.
प्रवाशांना सुविधा पुरविण्यासाठी तसेच महसुलात भर घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नागपूर रेल्वेस्थानकावर ओरवेल स्टेज प्रायव्हेट लिमिटेडसोबत या अभिनव योजनेचा शुभारंभ केला आहे असून ओयो या संघटनेच्या माध्यमातून रुमचे बुकिंग करता येईल. त्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर ‘टुरिस्ट असिस्टंट बूथ’ची स्थापना करण्यात आली आहे. हे बूथ रेल्वेस्थानकावर २४ तास प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू राहणार आहे. येथे प्रवाशांना आपल्या आवडीच्या हॉटेलची खोली बुक करता येणार आहे. रेल्वे बोर्डाच्या धोरणानुसार प्रवाशांच्या सुविधेसाठी राष्ट्रीय ट्रान्सपोर्टर सोबत अग्रगण्य हॉटेलशी करार करण्यात आला आहे. यात नागपूर रेल्वेस्थानकावर दरवर्षी २५ वर्ग फुटाची जागा किरायाने देण्यात येणार असून त्यासाठी रेल्वेला वर्षभरात पाच लाखाचे उत्पन्न मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात आतापर्यंतचा हा पहिला प्रस्ताव आहे. विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सोमेश कुमार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्या उपस्थितीत या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम सहायक वाणिज्य व्यवस्थापक एच. के. बेहरा, विजय थुल यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य निरीक्षक तारा प्रसाद यांच्या निरीक्षणात सुरू करण्यात आला आहे.