आता रेल्वे तिकिटांचे बुकिंग भीम अॅपने शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:18 AM2017-12-02T00:18:08+5:302017-12-02T00:19:20+5:30
कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने भीम अॅपचा वापर सुरू केला असून आता प्रवासी युपीआय (युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस) किंवा भीम अॅपचा वापर करुन आरक्षणाचे आणि अनारक्षित तिकीट काढू शकतात.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने भीम अॅपचा वापर सुरू केला असून आता प्रवासी युपीआय (युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस) किंवा भीम अॅपचा वापर करुन आरक्षणाचे आणि अनारक्षित तिकीट काढू शकतात.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्र यांनी नागपूर विभागात ही सुविधा सुरू केली. उल्लेखनीय बाब म्हणजे देशातील सर्वच रेल्वेस्थानकांवर यापूर्वीच ‘पीओएस’ (पॉईंट आॅफ सेल) मशीनद्वारे डेबिट किंवा क्रेडिट कार्डने तिकीटाची रक्कम देण्याची व्यवस्था सुरू केली आहे. यात प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आधी तीन महिने भीम अॅपपासून तिकीट बुक केल्यास त्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. यामुळे प्रवाशांजवळ कॅशलेस तिकीट काढण्याचा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यासाठी प्रवाशांना तिकीट काऊंटरवर बुकिंगच्या वेळी प्रवासाची माहिती आणि भीम अॅपची माहिती द्यावी लागणार आहे. त्यानंतर आॅपरेटर द्वारा संगणकात माहिती फीड केल्यानंतर प्रवाशाच्या मोबाईलवर तिकीट बुकिंगसाठी एक मेसेज येईल. प्रवाशाने पुष्टी केल्यानंतर बँकेच्या खात्यातून तिकिटाच्या बुकिंगची रक्कम कपात होईल. ही प्रक्रिया पूर्ण होताच तिकीट काऊंटरवरील कर्मचारी तिकिटाची प्रिंट आऊट प्रवाशाला देईल.