आता क्यूआर कोडच्या आधारे फ्लॅट खरेदी करा; होणार नाही फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 08:08 PM2023-06-15T20:08:31+5:302023-06-15T20:09:32+5:30
Nagpur News आता १ ऑगस्टपासून गृहनिर्माण प्रकल्पांच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिरातींसोबत महारेरा क्रमांक आणि संकेतस्थळाच्याच बाजूला ठळकपणे क्यूआर कोड असणे अत्यावश्यक राहणार आहे.
नागपूर : राज्य सरकारच्या महारेराने बांधकाम प्रकल्पाकरिता क्यूआर कोड बंधनकारक केल्यामुळे आता ग्राहकांची फसवणूक होणार नाहीच, शिवाय एका क्लिकवर प्रकल्पाची इत्थंभूत माहिती मिळेल. आता १ ऑगस्टपासून गृहनिर्माण प्रकल्पांच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिरातींसोबत महारेरा क्रमांक आणि संकेतस्थळाच्याच बाजूला ठळकपणे क्यूआर कोड असणे अत्यावश्यक राहणार आहे.
विकासक आपल्या गृहनिर्माण प्रकल्पात जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी, यासाठी वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअप आणि विविध माध्यमांच्या माध्यमातून आपल्या प्रकल्पाच्या गुणवैशिष्ट्यांची जाहिराती करीत असतात. कुठलेही माध्यम वापरून केल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये आता महारेरा क्रमांक आणि महारेरा संकेतस्थळासोबतच क्यूआर कोडही ठळकपणे दर्शवणे, छापणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रकल्पाचा महारेराचा नंबर टाकून गुगलमध्ये चार टप्पे पुढे जाण्याऐवजी क्यूआर कोडमुळे प्रकल्पाची माहिती थेट ग्राहकांसमोर येणार आहे.
महारेराने देताहेत मार्च अखेरपासून क्यूआर कोड
मार्च अखेरपासून महारेराकडे नव्याने नोंदणी करणाऱ्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांना नोंदणी पत्रासोबतच प्रकल्पांचा समग्र तपशील असलेले क्यूआर कोडही द्यायला महारेराने सुरुवात केली आहे. महारेराकडे नोंदणीकृत जुन्या प्रकल्पांनाही महारेराने क्यूआर कोड उपलब्ध करून दिलेले आहेत. पण आता १ ऑगस्टपासून क्यूआर कोड बंधनकारक केले आहे. तसे परिपत्रक महारेराने नुकतेच जारी केले आहे.
प्रकल्पांची कागदपत्रे पाहण्याची गरज नाही
ग्राहकाने क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर प्रकल्पाची माहिती मोबाइलवर तात्काळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लोकांना कागदपत्रे पाहण्याची गरज नाही. एका प्रकल्पासाठी एकच क्यूआर कोड राहणार आहे. ग्राहकांसाठी चांगली गोष्ट आहे. त्यामुळे व्यवहार आणखी पारदर्शक होतील.
संजय भीमनवार, उपसचिव, महारेरा, नागपूर.
क्यूआर कोड बिल्डरांसाठी फायद्याचा
प्रकल्पाची माहिती जाणून घेण्यासाठी क्यूआर कोड अत्यंत महत्त्वाचा आहे. यात बिल्डरांचाही फायदा आहे. ग्राहकांना बिल्डरांच्या पारदर्शक व्यवहाराची माहिती मिळेल. शिवाय व्यवहार गतिमान होतील. सध्या नागपुरात जवळपास ८०० नवीन बांधकाम प्रकल्प सुरू आहेत.
गौरव अगरवाला, अध्यक्ष, क्रेडाई नागपूर मेट्रो.