आता चिल्लर व ठोक विक्रेते उद्योजकांच्या श्रेणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:07 AM2021-07-03T04:07:10+5:302021-07-03T04:07:10+5:30
नागपूर : देशातील चिल्लर व ठोक व्यापारी आता एमएसएमईच्या श्रेणीत सहभागी झाल्याने सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. या ऐतिहासिक ...
नागपूर : देशातील चिल्लर व ठोक व्यापारी आता एमएसएमईच्या श्रेणीत सहभागी झाल्याने सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. या ऐतिहासिक निर्णयासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले आहे.
व्यापाऱ्यांचा एमएसएमईमध्ये समावेश करण्याचा मुद्दा कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) दोन वर्षांपासून लावून धरला होता आणि विविध स्तरावर सरकारसोबत बातचीत सुरू होती. सरकारच्या निर्णयाने देशातील जवळपास आठ कोटींपेक्षा जास्त छोट्या व्यावसायिकांना फायदा होणार आहे.
देशातील चिल्लर व ठोक व्यापारी जवळपास ४० कोटी लोकांना रोजगार प्रदान करीत आहे. वर्षभरात जवळपास ११५ लाख कोटींचा व्यवसाय करतात. कोरोना महामारीने प्रभावित व्यापाऱ्यांना आता व्यवसाय वाढीसाठी बँकांकडून वित्तीय मदत घेण्यास अडचण जाणार नाही.
कॅटचे अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, बँका चिल्लर व ठोक व्यापाऱ्यांना सहजरीत्या कर्ज देत नव्हत्या. पण आता सरकारच्या निर्णयामुळे त्यांना कर्ज घेण्यास सुविधा होणार आहे. त्यामुळे देशातील किरकोळ व्यवसायाला पुन्हा चांगले दिवस येतील.
नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, या निर्णयामुळे व्यापारी खूश आहेत. त्यामुळे सरकारी योजनांचा फायदा व्यापाऱ्यांना मिळण्यास अडचणी येणार नाही. याशिवाय व्यवसाय वाढीसाठी त्यांना बँकांकडून कर्ज मिळेल. सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे.