आता चंद्रपूर, अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालय; ९ उप्रादेशिक परिवहन कार्यालयांचा वाढविला दर्जा
By सुमेध वाघमार | Published: June 23, 2023 03:54 PM2023-06-23T15:54:27+5:302023-06-23T15:57:49+5:30
या निर्णयाने नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणारे चंद्रपूर व गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वेगळे झाले.
नागपूर : परिवहन विभागांतर्गत येणाऱ्या राज्यातील ९ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचा दर्जा वाढवून प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) रुपांतर करण्यात आले. यात विदर्भातील चंद्रपूर व अकोल्याचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, संबंधित कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कार्यालय प्रमुख म्हणून घोषीत करण्यात आल्याने हे प्रमोशन का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्यातील पिंपरी -चिंचवड, जळगाव, सोलापूर, अहमदनगर, वसई (जि. पालघर, अकोला, बोरीवली (मुंबई) व सातारा येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांचे दर्जामध्ये वाढ करुन प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुपांतर करण्याचा निर्णयाला शुक्रवारी शासनाने मान्यता दिली. या निर्णयाने नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणारे चंद्रपूर व गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वेगळे झाले. आता चंद्रपूर प्रादेशिक परिवहन कार्यालय झाल्याने या कार्यालयाला गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जोडण्यात आले. नागपूर ग्रामीण कार्यालयाचे क्षेत्र हे नागपूर ग्रामीणसह भंडारा व गोंदिया जिल्हा पुरतेच राहणार आहे.
- अमरावती ‘आरटीओ’अंतर्गत आता दोनच कार्यालय
अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत पूर्वी अमरावतीसह यवतमाळ, बुलढाणा, वाशिम व अकोला या पाच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा कारभार चालायचा. नव्या निर्णयामुळे आता अमरावती ‘आरटीओ’चे क्षेत्र अमरावतीसह यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालय असणार आहे. अकोला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दर्जा वाढविल्याने ते प्रादेशिक परिवहन कार्यालय झाले असून या कार्यालयाच्या अधिनस्त बुलढाणा व वाशिम उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आले आहेत.
- प्रमोशनचे काय?
परिवहन विभागाने राज्यातील ९ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांना कार्यालय प्रमूख म्हणून घोषीत केले. यामुळे अधिकाºयांच्या मनात हे प्रमोशन आहे का?, शिवाय, जे सेवाज्येष्ठतानुसार प्रमोशनच्या रांगेत आहेत त्यांचे काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.